मुंबई : विशेष प्रतिनिधी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे समर्थन केले आहे. हा निर्ल्लजपणाचा कळस आहे. शिंदेंनी ‘जनाची नाही तर मनाची तरी बागळावी ’, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (२८ जुलै) केली. (Sapkal slams Shinde)
महायुती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असे नाही तर मुख्यमंत्रीपद भूषवलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘कंबरेचे सोडून डोक्याला बांधले’ आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला. (Sapkal slams Shinde)
शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे समर्थन केल्याबद्दल तोफ डागत सपकाळ म्हणाले की, गृहराज्यमंत्र्यांनी आईच्या नावाने मुंबईतील कांदिवलीमध्ये ‘सावली’ नावाचा डान्सबार सुरु होता, या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला, या डान्सबारमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद केलेले आहे. हा डान्सबार आपल्या पत्नीचा नावाने आहे याची कबुली गृहराज्यमंत्री कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे, असे असताना उपमुख्यमंत्री शिंदे या डान्सबारचे समर्थन कसे काय करत आहेत? (Sapkal slams Shinde)
हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिंदेंनी डान्सबारमध्ये मुली नाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हा कसला विकास व कोणाचा विकास आहे? यावरही प्रकाश टाकावा, असे सांगून सपकाळ म्हणाले की, ‘एकनाथ शिंदेच भाजपाच्या इशाऱ्यावर कठपुतलीसारखे नाचत आहेत. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारला बंदी केली होती याची त्यांनी माहिती घ्यावी आणि मगच काँग्रेसवर बोलावे. लाखो लोकांचे संसार उद्धवस्त करणारी डान्सबार संस्कृती हवीच कशाला?, एकीकडे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून मिरवता आणि त्याच बहिणींचे संसार मोडीत काढणाऱ्या डान्सबारचे समर्थन कोणत्या तोंडाने करता? गृहराज्यमंत्री कदम यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांच्या विधानावर खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.