Mahadevi elephant : महादेवी हत्तीणीची रवानगी अंबानीच्या ‘वनतारा’ मध्ये

Mahadevi elephant

कोल्हापूर : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या महादेवी हत्तीणी ची रवानगी प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांच्या वनतारामध्ये रवानगी होणार आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर अवघ्या तासाभरात वनताराची टीम ॲनिमल ॲम्ब्युलन्सची दाखल झाली आहे. महादेवी हत्तीणीची पूजा करुन तिला निरोप देण्याचा निर्णय जैन समाजाचा मठ आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. (Mahadevi elephant)

बाराशे वर्षांची परंपरा असलेला नांदणी  येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, कोल्हापूर, तेरदाळ, बेळगाव हा प्रसिद्ध आहे. या मठाकडे धार्मिक विधीसाठी हत्तीसाठी महत्व असल्याने मठाच्यावतीने हत्ती पाळला जातो. मठाच्यावतीने हत्तीचे पालनपोषण केले जाते. तसेच त्यासाठी माहूत आणि मदतनिसांची नियुक्ती केली आहे.  दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने  एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नुकतेच नोंदविले होते. त्यानुसार नांदणी येथील ‘महादेवी हत्तीण’ला गुजरात येथे दोन आठवड्यात पाठविण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज सोमवारी त्यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. (Mahadevi elephant)

दरम्यान नांदणीतील हत्तीणीला वनतारा येथे हलवू नये अशी मागणी ग्रामस्थांकडून केली गेली. त्यामुळे गेले तीन दिवस नांदणी परिसरात तणावाचे वातावरण आहे. हत्ती नांदणीतच रहावा यासाठी मुक निदर्शने करुन गावात मोर्चाही काढण्यात आला होता. पण अखेर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याची माहिती मिळताच गावात महादेवी हत्तीण जाणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. गावकरी एकत्र जमले. पण नांदणीच्या जैन समाजाच्या मठाधिपतीनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे पालन केले जाईल असे सांगितले. मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य असून यावर मी जास्त बोलणार नाही. (Mahadevi elephant)

हत्तीणीला नेण्यासाठी काही दिवसापासून जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक दाखल झाले आहे. पण नागरिकांच्या विरोधांमुळे हत्तीणीला नेणे शक्य झालेले नाही. दरम्यान महादेवी हत्तीणीची पूजा करुन पाठवणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mahadevi elephant)

दरम्यान या निर्णयावर तीव्र  प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यंनी एका बड्या उद्योगपतीचा बालहट्ट पुरवण्यासाठी समाजाच्या भावना पायदळी तुडवून हा निर्णय लादला गेला आहे. हे अंबानी उद्योग समुहाला महागात पडेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

रास्त मुद्दे, तरी अवसानघातकी `पवार` वेळ

तुरुंगात जाण्याचं स्वप्न