Sapkal on Emergency: देवरसांनी आणीबाणीचे समर्थन केले होते : सपकाळ

Sapkal on Emergency

मुंबई : विशेष प्रतिनिधी : रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा संबंध नाही असेही जाहिर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (२५ जून) विचारला आहे. (Sapkal on Emergency)

देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर स्वतः इंदिरा गांधी, सोनिया आणि राहुल गांधी यांनी प्रशासनाकडून काही चुका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली. (Sapkal on Emergency)

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत भाजपाचा खरपूस समाचार घेऊन ते म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता तो संवैधानिक होता. देशात काही शक्ती अराजक निर्माण करू पहात होत्या. नंतर आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्या आणि लोकशाही प्रक्रिया पार पाडली. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीवेळी देशाची संपत्ती विकली नाही, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या नाहीत. पण देशात गेल्या ११ वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरु आहे, विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात आज हुकूमशाही असून भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात आहे.

जाहिरातीत सेंगोल

भाजप सरकारने आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ लागू करायचे आहे, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकाचा आणीबाणी विशेषांक काढला आहे. या अंकात इंदिरा गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार आहे. भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल, असे ते म्हणाले. (Sapkal on Emergency)

ती माहिती ‘आरटीआय’मधूनच मिळालेली

राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले हे आरटीआयमधून उघड झाले आहे. फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही माहिती मागविली आहे. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. याची शहानिशा करावी असे निवडणूक आयोगाने सांगितले पण शहानिशा केलेली नाही. गुडदे -पाटील यांनी न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेला नाहीत. याची उच्चस्तरीय चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावरून दूर रहावे, अशी मागणी ही सपकाळ यांनी केली. (Sapkal on Emergency)

चांदीच्या ताटात पाहुणचार
संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील लोकांनी पाच हजार रुपयांचे शाही भोजन, ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात पाहुणचार झोडला तो धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा प्रश्न विचारून अंदाज समितीच्या तमाशाचा हा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवानी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार