Saket Ghokhle : नौदल अधिकाऱ्याच्या विधवेवर अश्लील टिप्पणी

Saket Ghokhle

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीला लक्ष्य करुन अश्लील आणि व्देषपूर्ण टिप्पण्या भाजप संबधित असलेल्या सोशल मिडियाच्या अकाउंट्सवरुन पोस्ट केला जात आहेत, असा आरोप तृणमुल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांनी केला आहे. या पोस्टच्या संदर्भात खासदार गोखले यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना ‘हा तुमचा राष्ट्रवाद आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. विनय नरवाल यांच्या पत्नींनी जातीय सलोख्याचे आवाहन केल्यानंतर त्यांच्यावर अश्लील आणि व्देषपूर्ण टिप्पण्या पोस्ट केल्या आहेत. (Saket Ghokhle)

 “पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवेवर अश्लील आणि द्वेषपूर्ण टिप्पण्या दिल्या जात आहेत हे पाहून धक्का बसला आहे. विष पसरवणारी बहुतेक खाती भाजपशी संबंधित आहेत. का? फक्त त्यांनी जातीय सलोख्याचे आवाहन केले म्हणून,” असे खासदार साकेत गोखले यांनी एक्स  वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. अश्विनी वैष्णव यांना थेट आवाहन करताना ते पुढे म्हणाले, “आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर द्यावे की, ही अकाउंट्स का बंद केली जात नाहीत? किंवा ब्लॉक केली जात नाहीत? तुमच्या पक्षातील ट्रोल जेव्हा एखाद्या पीडितेला आणि मारल्या गेलेल्या सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्याच्या विधवेला लक्ष्य करतात तेव्हाही ते कायद्याच्या कक्षेतून मुक्त आहेत का? हा तुमचा “राष्ट्रवाद” आहे का?”  असा सवालही त्यांनी केला आहे. (Saket Ghokhle)

पहलगाम हल्ल्यानंतर शोक व्यक्त करणारे नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी काही दिवसांपूर्वी जनतेला जातीय द्वेष पसरवणे आणि कोणत्याही विशिष्ट समुदायाविरुद्ध सूड उगवणे थांबवण्याचे आवाहन केले. “आम्हाला लोक मुस्लिम किंवा काश्मिरींच्या मागे लागावे असे वाटत नाही. आम्हाला सध्या फक्त शांतता हवी आहे. अर्थात, आम्हाला न्याय हवा आहे, परंतु सरकारने विशेषतः ज्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत,” हिमांशी यांनी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान कार्यक्रमात या भावना व्यक्त केल्या होत्या. (Saket Ghokhle)

Related posts

ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?

अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?

१५ लाख कोटींचा डोलारा, एलआयसी ला १६०० कोटींचा फटका