Saint Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

Sant Tukaram Maharaj

पुणे : प्रतिनिधी : आषाढी एकादशीसाठी पंढरीकडे जाणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडीचे प्रस्थान झाले. देहू येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.  तर पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. यापूर्वी संत निवृत्तीनाथाची पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहे. उद्या गुरुवारी आळंदी हून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन्ही पालख्या शुक्रवारी पुण्यात येणार असून पुण्यनगरी पालख्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. (Saint Tukaram Maharaj)

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी….  ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. (Sant Tukaram Maharaj)

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते. महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

आपली संस्कृती, संतांचे विचार व परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Saint Tukaram Maharaj)

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज समूहशिल्पाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे – आळंदी पालखी मार्गावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समूहशिल्प  आणि संतसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. या संतसृष्टीत विविध संतांच्या जीवनावर आधारित विविध भित्तीचित्रे आहेत. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई व इतर वारकरी २० असे एकूण २५ शिल्पे मिश्र धातूमध्ये बनविण्यात आली आहे. विविध संतांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित एकूण ४७ कांस्य धातूमधील शिल्पांचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. यासाठी ३० कोटी ६९ लाख रुपयांतून कामे उभारण्यात आली आहेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर