Sachin Vaze’s application in court : ‘मनी लाँड्रिंग’ कारवाई रद्द करण्यासाठी सचिन वाझेचा पुन्हा अर्ज

Sachin Vaze's application in court

 जमीर काझी :  मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात वसुली, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेंटिनच्या काड्या असलेले वाहन ठेवणे व मनसूख हिरेच्या हत्या अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या वादग्रस्त बडतर्फ एपीआय सचिन वाझे याला आता आपल्या कृत्याबाबत पश्चाताप होत आहे. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपण वसुली करीत होतो, त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेली कारवाई रद्द करा, असा अर्ज त्याने नव्याने मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला आहे. (Sachin Vaze’s application in court)

वाझे हा गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या समोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्याच्या अर्जावर ईडीला २५ नोव्हेंबरपर्यंत आपलं उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाझेने दिलेल्या अर्जात तपासयंत्रणेने आपल्यावर केलेले आरोप हे सर्वसाधारण असून गुन्हा दाखल करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सरकारकडून अनिवार्य असलेली पूर्वपरवानगी इथं घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ईडीनं सुरू केलेला हा खटला रद्द करावा, त्याचबरोबर तपासयंत्रणेनं केलेले आरोप हे पीएमएलए अंतर्गत गुन्हा ठरत नाहीत. आपण केवळ तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आज्ञेचं पालन केले. त्यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला आहे.  (Sachin Vaze’s application in court)

सचिन वाझेवर आरोप काय ? मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची अंटेलिया जिलेटिन प्रकरणी आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला. त्यांनी बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोपही केला होता. दरमहा १०० कोटींच्या कथित खंडणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार सीबीआयने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता.

काय होतं प्रकरण? : ईडीने या प्रकरणी अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना एप्रिल २०२२ मध्ये सीबीआयने अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्यापूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी सचिन वाझे याला एनआयएकडून अटक करण्यात आली होती. (Sachin Vaze’s application in court)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर