Rohit Arya : पोलिसांनी १७ मुलांना ओलिस ठेवणाऱ्या माथेफिरुला केले ठार

Rohit Arya

मुंबई : प्रतिनिधी : १७ मुलांना बंधक बनवून मागण्या मान्य न झाल्यास स्टुडिओ पेटवून देणार अशी धमकी देणाऱ्या माथेफिरुला पोलिसांनी बंदुकीची गोळी झाडून ठार मारुन मुलांची सुटका केली. हा थरार मुंबईतील पवई भागातील आरए स्टुडिओमध्ये घडला. पोलिसांनी नियोजनबद्ध आखणी करुन माथेफिरु बोलण्यात गुंतवून मुलांची सुटका केली. यावेळी झालेल्या झटपटीत पोलिस निरीक्षक  अमोल वाघमारे यांच्या फायरिंग माथेफिरू ठार झाला. रोहित आर्या असे माथेफिरुचे नाव आहे. (Rohit Arya)

रोहित आर्याने व्हिडिओ करुन दिली धमकी

पोलिस आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर्या याने काही मुलांना पवई येथील आरए स्टुडिओमध्ये  वेब-सिरीजसाठी ऑडीशन आणि वर्कशॉपसाठी बोलावले होते. गेल्या सहा दिवसांपासून मुलांचे ऑडीशन सुरू होते. मात्र आज गुरुवारी  मुले जेवणासाठी बाहेर न आल्याने त्यांना ओलीस ठेवल्याच प्रकार समोर आला. मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. बहुतांशी मुले १५ वर्षांखालील होती. रोहित आर्या याने व्हिडीओ सोशल मिडियावर टाकून मुलांना बंधक ठेवल्याचे सांगतल्यावर हा प्रकार लक्षात आला, व्हिडिओमध्ये तो असे म्हणत होता, “मला काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. मी काही टेररिस्ट नाही. माझी पैशांची मागणी नाही. माझी मागणी फक्त काही लोकांशी बोलण्याची आहे. माझी मागणी मान्य झाली नाही, तर या ठिकाणाला मी आग लावून टाकेल. यासाठी मी जबाबदार राहणार नाही. माझी काही लोकांशी चर्चा झाली तर मी स्वतः बाहेर येईल. मला कोणतीही दुखापत झाली नाही पाहिजे. मी एकटा नाही,” अशी धमकी रोहित आर्या याने दिली होती. (Rohit Arya)

आर्यावर गोळी झाडून १९ जणांची सुटका

व्हिडिओ सोशल मिडियावर झळकल्यावर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पोलिसांनी आरोपी रोहित आर्याला बोलण्यात गुंतवून स्टुडिओच्या बाथरूममधून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला आणि सर्व मुलांची सुखरुप सुटका केली. त्यानंतर रोहित आर्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती देताना सह पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, सर्व मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तसेच रोहित आर्याकडे एअर गन होती आणि त्याच्याकडे काही केमिकलही सापडले आहेत. आतमध्ये एकूण १९ जण होते. यामध्ये एक ज्येष्ठ  नागरिक तसेच दोन स्थानिकांचा समावेश होता. रोहित आर्याने संबधित मुलांना एका वेब-सिरीजसाठी ऑडीशनसाठी बोलावले होते. त्यामुळे मुलांची सुखरूप सुटका होणे, जे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्याशी बोलून इतर काही पोलिसांनी बाथरूममधून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली, अशी माहिती सत्यनारायण चौधरी यांनी दिली. (Rohit Arya)

गोळीबारात जखमी झालेल्या आर्याचा रुग्णालयात मृत्यू

दरम्यान, स्टुडीओमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला. यावेळी रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रोहित आर्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर मुलांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Rohit Arya)

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक