मुंबई : पुण्यातील मावळ येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. संबंधितांवर कारवाईच्या घोषणा करण्यात आल्या. परंतु हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास थंड पडला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले आहे. सरकार या प्रकरणात दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे. (Rohini Khadse slams Maha police)
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, “अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. ‘आपल्याच’ माणसांवर ते का कारवाई करतील? प्रकरण ताजे असेपर्यंत आम्ही काहीतरी करतोय असे दाखवले जाईल, प्रकरण शांत झाले की आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाईल, असे मी आधीच म्हटले होते. तसंच घडतंय! शासनाला जनाची नाही तर मनाची असेल तर तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा, तिच्या तहान बाळाचा विचार करा?”
पोलीस कारवाईसंदर्भात त्यांनी आपली भूमिकाही पोस्टमध्ये स्पष्ट केली आहे. ‘‘वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. हे मी म्हणत नाही तर आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेली समिती म्हणत आहे.” (Rohini Khadse slams Maha police)
“विधानसभेत शुक्रवारी (१८ जुलै) मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जो अहवाल सादर केला त्यात जालिंदर सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही. तसेच सुपेकरांवर कारवाई झालेली नाही, असे त्यात म्हटले आहे”