Rajkot Fort : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवराय पुतळा परिसरात पर्यटन केंद्र उभारणार

Rajkot Fort

मुंबई  : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात त्यांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे  भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि  पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (Rajkot Fort)

भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य, शौर्य,  पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. त्यांनी पहिले आरमार स्थापन करुन दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा ८३ फुट उंचीचा  पुतळा नुकताच उभारण्यात आला आहे.  याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  या पुतळ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या राजकोट किल्ल्याला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. हा किल्ला  पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या भविष्यात वाढू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात स्थापन केलेल्या आरमाराचा इतिहासाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी  राजकोट किल्ला परिसरात भव्य आरमार-नौदल संग्रहालय उभे राहण्यासह परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीनं विकास करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं यासंबंधीच्या प्रस्तावाचा अभ्यास करुन पुढील कार्यवाही करावी, सदर प्रकल्पासाठीची जागा खाजगी व्यक्तीकडून अधिग्रहीत करण्याची कार्यवाही चर्चेतून, सामोपचारांनं पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मत्स्यव्यवसाय व बंदरविकासमंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पामागची भूमिका विशद करुन सविस्तर माहिती दिली. (Rajkot Fort)

 बैठकीला, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Rajkot Fort)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग