Rajan Gavas : शंकर पाटील यांच्या गंभीर लेखनाकडे दुर्लक्ष: राजन गवस

Rajan Gavas

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर : शंकर पाटील हे मराठीतील एक अव्वल दर्जाचे लेखक होते. ग्रामीण विनोदी कथाकथनकार म्हणून त्यांचा लौकिक असला तरी त्यांनी केलेले गंभीर लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याची नीट समीक्षा होण्याची आवश्यकता आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी व्यक्त केले.

ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आठ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील रहिवाशी असलेले शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिनमान साहित्य उत्सवात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये डॉ. गवस बोलत होते.

शंकर पाटील यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी शंकर पाटील यांच्या बंधारा या गंभीर कथेचे अभिवाचन करून उपस्थितांना हेलावून सोडले. कथाकार बाबासाहेब परीट यांनी शंकर पाटील यांची धिंड ही कथा कथन करून वेगळीच रंगत आणली. शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्यावतीने कथा अकलेच्या कांद्याची या नाटकातील प्रवेश सादर केला. तर तिसरी घंटा या नाट्यसंस्थेच्यावतीने शंकर पाटील यांच्या पाळणा या कथेवरील एकांकिका सादर केली.

प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले नामदेव माळी यांनी शंकर पाटील यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितले. त्यांच्या कथेचा भौगोलिक परिसर, त्यांच्या कथेतील पात्रांची भाषा अशा विविध बाबींचा ऊहापोह माळी यांनी केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले डॉ. गवस म्हणाले, शंकर पाटील हे आपल्या भागातले, आपल्या मातीतले लेखक होते. ते संपूर्ण मराठी भाषेचे लेखक होतेच, पण विशेषत: कोल्हापूरचे होते. कारण अलीकडे कोल्हापुरी भाषेबद्दल मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. सजगतेने विचार चालू आहे. ही सजगता शंकर पाटील यांनी कितीतरी वर्षांपूर्वी संपूर्ण कोल्हापुरी बोली आपल्या साहित्यातून आणून दाखवली आहे. टारफुला ही त्यांची एकमेव कादंबरी जरी वाचली तरी शंकर पाटील यांच्या शक्यता किती अधिक होत्या आणि हा किती मोठा लेखक होता याचा प्रत्यय आपल्याला येतो. त्यांनी लिहिलेले गंभीर लेखन हे मराठीमधले अत्यंत श्रेष्ठ लेखन आहे. म्हणजे ‘भुजंग’सारखी एखादी कथा किंवा ‘वेणा’सारखी एखादी कथा, या कथा वाचल्यानंतर शहारून जातो, त्यावरून समजते की या लेखकाची ताकद काय आहे. पण त्यांच्या या गंभीर लेखनाकडे समीक्षकांचे दुर्लक्ष झाले आहे.’’

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, तसेच सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

शंकर पाटील यांच्या ‘कथा अकलेच्या कांद्या’ची या वगनाट्यातील प्रवेश सादर करताना शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे कलाकार.

शंकर पाटील यांच्या ‘पाळणा’ या कथेवरील एकांकिका सादर करताना तिसरी घंटा’चे कलाकार.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर