जमीर काझी : मुंबई : अवघ्या दोन महिन्यात पितळ उघड पडलेल्या मिसिंग लिंकची झालेली घटना मान्य करून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाच इशारा देत आहेत. मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र नव्हे, असा हल्लाबोल करतानाच महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदीत बोलून त्यांनी दिल्लीतील नेत्यांना इशारा दिला असावा असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी लगावला
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दादर येथील सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राम मंदिरातील चोरीवर बोलणे म्हणजे धर्माविरुद्ध नव्हे आणि माणसाच्या मरणावर हसणाऱ्या आमदाराना सत्तेचा माज आला आहे, अशी घणाघाती टीका भाजपावर केली. (Raj Thackeray launches a scathing attack on Fadnavis)
बघून घेईन ही भाषा मुख्यमंत्र्याच्या तोंडी कशी येऊ शकते?
गेल्या काही दिवसात देशात व राज्यात घडत असलेल्या घडामोडी भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून केली जाणारे खासदार आमदारांची फोडाफोडी आणि पहिल्याच पावसात मुंबईची आणि राज्यातील दळणवळण व्यवस्थेची झालेली दुरावस्था, मुख्यमंत्री मंत्री व सत्ताधारी आमदारांची वर्तणूक याबाबत त्यांनी ठाकरे शैलीत समाचार घेतला.ते म्हणाले ,’ मी बघून घेईन. ही भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी कशी येवू शकते? एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन, माझ्यावर ५ खुनांचे आरोप आहोत , असे सांगतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही.
यात कुठे महाराष्ट्राचा अपमान झाला?
मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आले असून यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. असा टोला लगावला. (Raj Thackeray launches a scathing attack on Fadnavis)
दानपेटी अपहाराबद्दल बोललो की धर्माचा अपमान
राज ठाकरे म्हणाले,’ राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? असा सवाल करून ते म्हणाले,’या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती.
तुमच्याकडून झालं की नैसर्गिक आपत्ती
२००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? असा सवाल केला.
विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.
ब्रिटीशकालीन वास्तू अजूनही उभ्या आहेत.
१ मे ला मिसिंग लिंकचं उदघाट्न झालं आणि पुढे ६० ते ६५ दिवसांत तिथे पिलर पडून तिथे पाणी गळायला लागले. ब्रिटिशांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आज देखील उभं आहे, ब्रिटिशांच्या काळात उभे राहिलेले ब्रिज अजून टिकून आहेत. अमेरिकेत उभी राहिलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यात उभी राहिली पण आज देखील उभी आहे. असे सांगितले.
गडकरी रस्ते बांधायचं सोडून इथेनॉलबद्दल बोलतायेत
नितीन गडकरींच्या खात्याचं काम रस्ते बांधायचं. पण ते सोडून ते बोलत आहेत पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळायचं यावर. हे तुमचं काम नाही ते पेट्रोलियम मंत्री बघून घेतील. भाजपचा एक आमदार, विधिमंडळात लोकं कशी गटारात पडून मरत आहेत, झाडं पडत आहेत यावर चर्चा सुरु आहे म्हणून हसतोय. भावनाशून्य झाले आहेत आपले सत्ताधारी, आमदार फोडता येत आहेत का, खासदार फोडता येत आहेत का, नगरसेवक फोडता येतील का यातच रमले आहेत. एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन, माझ्यावर ५ खुनांचे आरोप आहेत असं सांगतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही, असे सांगून संताप व्यक्त केला. (Raj Thackeray launches a scathing attack on Fadnavis)