कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेसचे निष्ठावंत नेते स्वर्गीय माजी आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील सोमवारी २५ ऑगस्ट रोजी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राहूल पाटील यांच्या प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद करवीर तालुक्यात वाढणार आहे. (Rahul Patil)
करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवंगत आमदार पी एन पाटील यांना मानणारा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत
राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशाची माहिती दिली. ते म्हणाले, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी आयुष्यभर ज्या विचारधारेने सर्वसामान्यांसाठी कार्य केले. त्याच कार्याचा वारसा आम्ही पुढे चालवणार आहोत. जनतेच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही ‘शिव-शाहू ,फुले, आंबेडकरी’ विचारधारा मानणार आहे. यामुळे काम करताना कोणतीही अडचण येणार नाही .आम्ही फक्त पक्ष बदलला आहे, विचारधारा नाही .अशी भूमिका पक्षप्रवेशाबाबत मांडली. (Rahul Patil)
राहुल पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आमदार पी एन पाटील यांना जे पाठबळ दिले तशीच खंबीर साथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणाला देण्याची ग्वाही दिली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पी एन पाटील यांना मानणाऱ्या नेते मंडळींशी चर्चा झाली. सा साऱ्यांना विश्वासात घेऊनच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकीत पी एन पाटील गट म्हणूनच स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहोत तशी चर्चाही उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी झाली आहे. २०२९ मधील विधानसभा निवडणुकीला नरके गटाच्या विरोधात मी उमेदवार असणार आहे असेही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली का? या प्रश्नावर राहुल पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आमच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत होता. यासंदर्भात मी व राजेश पाटील दोघांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मानावा लागेल असे त्यांना सांगितले. (Rahul Patil)
पत्रकार परिषदेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे संचालक भारत पाटील भुयेकर, शंकरराव पाटील, बी एच पाटील, शिवाजीराव कवठेकर, चेतन पाटील, रामचंद्र भोगम, शिवाजी आडनाईक, संदीप पाटील, प्रकाश मुगडे, शिवाजी कारंडे, हंबीरराव वळके आदी उपस्थित होते