अमृतसर : पंजाबमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता गरज पडल्यास रहिवाशांना स्थलांतरित करण्याची तयारी केली आहे. सर्व जिल्ह्यांमधील बेसमेंट पार्किंग, शाळा, गुरुद्वारा आणि इतर संरक्षित ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Punjab Situation)
शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री अनेक जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. पठाणकोट, फिरोजपूर, अमृतसर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये स्फोटांसारखे आवाज ऐकू येत होते. रहिवाशांनी ड्रोन पाहिल्याची तक्रार केल्याने ब्लॅकआउट लागू करण्यात आला. “दररोज तणावाची परिस्थिती वाढत असताना, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची आवश्यकता असल्यास आम्ही पार्किंग, शाळा, गुरुद्वारा आणि इतर ठिकाणांचे मॅपिंग केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत आम्ही जलद कारवाई करू शकू. त्यासाठी आम्ही आधीच सराव केला आहे,” असे सीमावर्ती जिल्ह्यांतील एका उपायुक्तांनी सांगितल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.(Punjab Situation)
वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर, पॉवर ग्रीडवर आणि संपर्कासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन, पशुसंवर्धन आणि जनसंपर्क यांसारखे विभाग सक्रिय करण्यात आले आहेत.
सरकारने संवेदनशील ठिकाणांची यादी तयार केली आहे.
पठाणकोट, गुरुदासपूर, बटाला, अमृतसर ग्रामीण, तरण तरण, फिरोजपूर आणि फाजिल्का या सात जिल्ह्यांच्या सीमेवर कडक नजर ठेवण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे.
राज्य पोलिस आणि प्रशासन सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय राखत आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
सीमावर्ती गावे हाय अलर्टवर आहेत. तेथे गरज पडल्यास स्थलांतर करण्यात येणार आहे.(Punjab Situation)
सरकारने सर्व आयएएस, आयपीएस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.
आधीच रजेवर असलेल्यांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
शैक्षणिक संस्था देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.
हल्ल्याच्यावेळी आश्रयस्थान म्हणून वापरता येतील अशी ठिकाणांची योजना आधीच करून ठेवण्यात आली आहे . ‘‘नेहमीप्रमाणे, गरज पडल्यास गुरुद्वारा स्थलांतरितांच्या मदतीसाठी येतील,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा :
पाकिस्तानच्या हल्ल्यात अतिरिक्त उपायुक्त ठार
मारले गेलेल्या दहशतवाद्यांत मसूद अझहरचे नातेवाईकही