शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर जुंपले आहे. आपणच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईसह राज्यभरातील मतदारसंघ व विविध माध्यमातून पोस्टर व जाहिराती प्रकाशित करीत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर ठाकरेसमर्थकांनी त्यांना गद्दार म्हणून हिणवत बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली आहे. (Poster war)

शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर दोन्ही गट विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे तीन दिवस उरले असल्याने या जाहिरात ‘वॉर’मधून मतदारांवर  प्रभाव पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहे. शिंदे गटाने ‘मी, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ हे बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य जाहिरातीत प्रसिद्ध केले आहे. विविध वृत्तपत्रांत त्याची जाहिरात आणि होर्डिंग लावण्यात आली आहेत. त्यातून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून  ठाकरेंकडून ही  जाहिरात देण्यात आली आहे. त्यावर भीती, भूक, भ्रष्टाचाराचा अंध:कार आता दूर करणार मशाल, असे  लिहिले आहे. त्यात सर्वात खाली बाळासाहेबांची मशाल असे नमूद केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी शिवसेनेची भाजपही होऊ देणार नाही, हेही सांगितले आहे. तसेच दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही, हेही सांगितले आहे. याचा सभेतून ठाकरे उल्लेख करीत आहेत. सोशल मीडियावरून दोन्ही गटांच्या समर्थकांकडून ते व्हायरल केले जात आहे.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ