नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत अणवस्त्रांच्या धमक्यांना भीक घालणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यांवरुन पाकिस्तानला दिला. पंतप्रधान मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यांवर झेंडावंदन केले. मोदी यांनी सलग १२ व्या वेळी तिरंगा ध्वज फडकाला. (PM Modi’s warning)
मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला स्वातंत्र्याचे हे पर्व १४० कोटी लोकांच्या गौरवाचे पर्व आहे, असे सांगून ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करताना १४० कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. (PM Modi’s warning)
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन करताना म्हणाले, देशभरातून मातृभूमीचा जयघोष ऐकू येतो आहे. महात्मा गांधींच्या सिद्धांतावर चालत असताना संविधान सभेच्या सदस्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भारताचे संविधान ७५ वर्षांपासून दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवतो आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सर्वपल्ली राधाकृष्णन या सगळ्यांनीच संविधान निर्मितीसाठी योगदान दिले. नारी शक्तीमधल्या विदुषींनीही भारताचे संविधान सशक्त केले. आज लाल किल्ल्यावरुन देशाला दिशा देणाऱ्या संविधानाची निर्मिती करणाऱ्यांना आदराने नमन करतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले, हा उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करत आहे. तिरंगा भारताच्या प्रत्येक घरात आहे, मग तो वाळवंटापासून हिमालयापर्यंत असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो. आज आपल्याला लाल किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. पण आता आम्ही अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालणार नाही, असा इशारा मोदींनी दिला. (PM Modi’s warning)
आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. आता देशाला कळले आहे की सिंधू करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी होता असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतातून निघणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूच्या शेतांना सिंचन करत आहे आणि माझ्या देशाची जमीन पाण्याशिवाय तहानलेली आहे. हा कसला करार होता? गेल्या सात दशकांपासून देशातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले आहे. भारत आणि त्याच्या शेतकऱ्यांचा भारताच्या हक्काच्या पाण्यावर एकमात्र अधिकार आहे. भारत भविष्यात सिंधू करार सहन करणार नाही कारण तो दशकांपासून ते सहन करत आहे. शेतकरी आणि राष्ट्राच्या हितासाठी आम्ही हा करार स्वीकारत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. (PM Modi’s warning)