नवी दिल्ली : पाकिस्तानने जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये ड्रोन आणि विमानाने हल्ला केला. पण भारताने पाकिस्तानाचे हल्ले परतावून लावले. पाकिस्तानची दोन जेट विमाने पाडण्यात यश मिळवले आहे. तसेच ड्रोन हल्ले हवेतच नष्ट करत पाकिस्तानचा डाव उधळून लावला. (Pak jet destroyed)
ऑपरेशन सिंदूर च्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू झाला आहे. बुधवारी रात्री ड्रोनचे हल्ले भारताने उधळून लावले. आज गुरुवारी रात्री जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. पण एस फोर हंड्रेड ने पाकिस्तानचे आठ मिसाईल नष्ट केले. जम्मू एअरपोर्टवर स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले. पठाणकोट विमानतळावरील हल्ले भारताने यशस्वीपणे परतावून लावले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर जम्मू मध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. (Pak jet destroyed)
पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला
पाकिस्तानी सैन्याने आदमपूर, भटिंडा, चंदीगडसह इतर ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न गुरुवारी (८ मे) केला. तथापि, ते प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
“७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यांसह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे लक्ष्य एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींनी निष्क्रिय केले,’’ असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. (Pak jet destroyed)
पंतप्रधानांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विविध मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. राष्ट्रीय सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार करतानाच सतत सतर्कता आणि स्पष्ट संवाद साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करणे, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.