‘लाडकी बहीण योजने’मुळे विरोधकांना धडकी; मुख्यमंत्र्यांची टीका 

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  विकासाबरोबरच सर्व जाती-धर्मातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जनता समाधानी आहे. ‌महिलांसाठी सुरु झालेल्या योजनेवर विरोधक टीका करत आहेत.  लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. या योजनेमुळे विरोधकांना धडकी बसली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महायुती सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजना भविष्यातही सुरु राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. (Ekanath Shinde)

कोल्हापूर महापालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. दसरा चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (Ekanath Shinde)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. त्यांनी शिक्षण, सहकार, उद्योगांसह सर्वसामान्यांच्या जीवनात सुख, समाधानाचे दिवस यावेत, यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून कोल्हापूरला उद्यमनगरी बनवली.  शाहूंचे कोल्हापूर जगाच्या नकाशावर आले पाहिजे, यासाठी गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने विविध योजना राबवण्यासाठी मोठा निधी देऊन कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलला आहे. कोल्हापूर जिल्ह्याची महापुरातून मुक्तता करण्यासाठी ३२००  कोटी रुपयांचा पूरनियंत्रण प्रकल्प मंजूर केला आहे. रंकाळा सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण, अमृत योजना, रस्ते, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

राज्यात महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. पण या योजनेवर विरोधकांकडून टीका सुरू आहे. या टिकेचा मुख्यमंत्री शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. पूर्वीचे सरकार हे हप्ते घेणारे होते. आमचे सरकार बहिणीच्या खात्यात हप्ते भरणारे आहे. बहिणींना मदत देणारी भावाची नियत ही चांगली असावी लागते. लाडक्या बहिणीला देण्यात येणारे पैसे हे सरकारचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे काम आम्ही करत आहोत. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना  धडकी भरली आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक शासनाने  काही कल्याणकारी योजना बंद केल्या पण महायुतीचे सरकार सध्या सुरू असलेल्या कुठल्याही योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.  महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका वर्षामध्ये इतक्या योजना कधीच झाल्या नाहीत, असा दावाही त्यांनी केला. (Eknath Shinde)

राज्य नियोजन मंडळाचे राजे क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरला कायम झुकते माप दिले आहे. मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेचे ५६० रोजंदारी कामगार कायम

मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर महापालिकेत गेली वीस वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या ५६० कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ नोकरीत कायम केल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या घोषणा देऊन जल्लोष साजरा केला.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी