कॉंग्रेसनेच संविधानाची खिल्ली उडवली

सांगली; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला.  १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. लोकांनी इंदिरा गांधींचा राजीनामा मागितला त्यावेळी काँग्रेसने संविधानाची खिल्ली उडवली, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

पलूस येथे महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जय भवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, किर्लोस्कर कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजीराव मगर-पाटील, संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष नीलेश येसुगडे, भाजप प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, प्रमुख उपस्थित होते. महायुती आल्यास जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावेल, अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले, ‘आणीबाणीवेळी लोकांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा राजीनामा मागितला. त्यावेळी काँग्रेसने स्वार्थासाठी, फायद्यासाठी संविधान तोडले, ते आता भाजप संविधान तोडणार असल्याची भाषा करतात.’

सांगली जिल्ह्यात महामार्गांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सात ते आठ हजार कोटी रुपयांची कामे केल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. केंद्रात जलसंवर्धन मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. त्यावेळी सहा हजार कोटी रुपयांचा निधी बळीराजा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला दिला. तसेच प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये सहा हजार कोटी, असा एकूण १२ हजार कोटींचा निधी मिळवून दिला. सोलापूर व सांगली दुष्काळी भागामध्ये टेंभू व म्हैसाळ प्रकल्पाला केंद्रातून निधी दिला. त्याचा परिणाम म्हणून हा परिसर हिरवागार झाला,’ असे गडकरी म्हणाले.

… तर देशातून पेट्रोल हद्दपार होईल

मंत्री गडकरी म्हणाले, आपल्या देशात २२ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल व डिझेल तयार होते. माझ्याकडे असणारी इनोव्हा कारसुद्धा शेतकऱ्यांनी बनवलेल्या शंभर टक्के इथेनॉलवर चालते. ती गाडी वीजसुद्धा तयार करणार आहे. आज इथेनॉलचा भाव साठ रुपये, तर पेट्रोलचा भाव १२० रुपये आहे. येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांत इथेनॉल उत्पादन क्षेत्रामध्ये ४०० पंप सुरू करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्याच विकत घ्या. त्यामुळे या देशातून पेट्रोल हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी