नवी दिल्ली : भारत सरकारने केलल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली. (Nehal Modi arrested)
अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला विनंती केली होती. त्या आधारे अमेरिकन अधिकाऱ्यांनी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा धाकटा भाऊ नेहलला अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी (५ जुलै) सांगितले.
या प्रकरणातील सुनावणीची पुढील तारीख १७ जुलै आहे. नेहल यावेळी जामीन मागू शकतो, परंतु अमेरिकन अभियोक्त्यांकडून त्याला विरोध केला जाईल, असे सांगण्यात आले. (Nehal Modi arrested)
नेहल मोदीला शुक्रवारी (४ जुलै) ताब्यात घेतल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारताला कळवले आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून हे पाऊल उचलण्यात आले.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या कलम ३ अंतर्गत मनी लाँड्रिंग आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट) आणि २०१ (गायब होणे) अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे अशा प्रमुख आरोपांखाली अमेरिकन अभियोक्त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यार्पणाची कार्यवाही करण्यात आली. (Nehal Modi arrested)
४६ वर्षीय नेहल हा पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित सर्वांत मोठ्या अशा १३,००० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीतील एक आरोपी आहे. हा घोटाळा नीरव आणि नेहल हे दोघे भाऊ आणि त्यांचे काका मेहुल चोक्सी यांनी घडवून आणल्याचा आरोप आहे.
नेहलचा जन्म बेल्जियममधील अँटवर्प येथील. तेथेच तो वाढला, शिक्षण घेतले. इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषा तो अस्खलित बोलतो. भाऊ नीरव मोदीच्या वतीने गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांची लाँडरिंग केल्याबद्दल तो भारताला हवा आहे. नीरव मोदी भारताच्या विनंतीवरून इंग्लंडकडून प्रत्यार्पणाच्या कारवाईला सामोरे जात आहे.
नेहलवर भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून बनावट कंपन्यांच्या जाळ्याद्वारे आणि परदेशातील व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर निधी लपविण्यास आणि हस्तांतरित करण्यास मदत केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नेहलचे नाव आहे आणि त्याच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आणि नीरव मोदीला त्याच्या कथित बेकायदेशीर कृत्यांमध्ये ‘जाणूनबुजून’ मदत केल्याचा आरोप आहे.
ईडीने आरोप केला आहे की पीएनबी फसवणूक उघडकीस आल्यानंतर, नेहलने नीरवचा जवळचा विश्वासू आणि कार्यकारी मिहिर आर भन्साळी यांच्यासह ‘‘दुबईहून ५० किलो सोने आणि मोठी रोख रक्कम घेतली आणि डमी संचालकांना त्याचे नाव अधिकाऱ्यांसमोर उघड करू नये असे निर्देश दिले,’’ असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
शिंदे गुजरात आणि शाहांचे गुलाम : सपकाळ