Narlikar passes away: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

jayant Naralikar

पुणे : प्रसिद्ध खगोल-भौतिकशास्त्रज्ञ, पद्मविभूषण सन्मानप्राप्त डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी (२० मे) पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. (Narlikar passes away)

डॉ. नारळीकर हे विज्ञान क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. विश्वविज्ञान त्यांचे अग्रगण्य योगदान आहे. विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते. देशात प्रमुख संशोधन संस्था स्थापन करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर यांचे मंगळवारी (२० मे) सकाळी झोपेत निधन झाले. त्यांच्या निधनाने विज्ञान क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. (Narlikar passes away)

त्यांच्या कंबरेची शस्त्रक्रिया नुकतीच शहरातील एका रुग्णालयात झाली होती. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत.

१९ जुलै १९३८ रोजी जन्मलेल्या डॉ. नारळीकर यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कॅम्पसमध्ये पूर्ण केले. तिथे त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे गणित विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख होते. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले आणि मॅथेमॅटिकल ट्रायपोसमध्ये रँग्लर आणि टायसन पदक पटकावले. (Narlikar passes away)

त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये सहभागी होण्यासाठी ते भारतात परतले. तिथे त्यांच्या नेतृत्वाखाली, सैद्धांतिक खगोल भौतिकशास्त्र गटाचा विस्तार झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली.

१९८८ मध्ये, विद्यापीठ अनुदान आयोगाने डॉ. नारळीकर यांना प्रस्तावित इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) चे संस्थापक संचालक म्हणून आमंत्रित केले. त्यांच्याच नेतृत्त्वात ‘आयुका’ची उभारणी झाली.

२००३ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी या संस्थेचे संचालकपद भूषवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, खगोलशास्त्र आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्समधील अध्यापन आणि संशोधनातील एक उत्कृष्ट केंद्र म्हणून जगभरात ख्याती मिळवली. ते आयुकामध्ये एमेरिटस प्रोफेसर होते.

२०१२ मध्ये, थर्ड वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्सेसने डॉ. नारळीकर यांना विज्ञानातील अत्युत्कृष्ट केंद्र स्थापन केल्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला. (Narlikar passes away)

त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाव्यतिरिक्त, डॉ. नारळीकर यांनी विज्ञान प्रसारातही महत्त्वाची भूमिका बजावली. पुस्तके, लेख आणि रेडिओ/टीव्ही कार्यक्रमांद्वारे विज्ञान संवादक म्हणून त्यांनी जनसामान्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.

विज्ञानकथा लेखक म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. (Narlikar passes away)

त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेऊन युनेस्कोने १९९६ मध्ये कलिंग पुरस्काराने सन्मानित केले.

भारत सरकारने पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे. २०११ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. २०१४ मध्ये, भारतातील प्रमुख साहित्यिक संस्था असलेल्या साहित्य अकादमीने त्यांच्या आत्मचरित्राची प्रादेशिक भाषेतील (मराठी) लेखनातील सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली.

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस