MVA Conflict : पराभवाच्या नैराशेतून ‘मविआ’मध्ये वादाच्या ठिणग्या!

MVA Conflict

मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडू लागल्याने राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीप्रमाणेच राज्यातील ‘मविआ’तही वादाची ठिणगी पडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील दुफळी महायुतीसाठी बोनस ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (MVA Conflict)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मुंबईत दोन दिवस बैठक झाली. या बैठकीत खा. अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविताना गुरुवारी, काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झालेली नाही तर शिवसेना ठाकरे गट अजून झोपेतून जागा झाला नसल्याची टीका केली. त्याला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देताना कोल्हेंनी स्वत:च्या पक्षाचे पहावे, यांनी जागावाटपाचा घोळ घातला नसता तर अधिक चांगल्या प्रकारे निवडणुकीला सामोरे जाता आले असे म्हटले; तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसने विदर्भात जागावाटपासाठी हट्ट केला नसता तर चित्र वेगळे दिसले असते, असा टोला लगावला.(MVA Conflict)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आप स्वतंत्रपणे लढत आहेत. इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी या निवडणुकीसाठी ‘आप’ला समर्थन दिले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी मोडीत निघाली असल्याची परिस्थिती आहे. तशीच परिस्थिती आता राज्यात ‘मविआ’ची झाली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्याने ‘मविआ’ या धक्यातून सावरलेली नाही.(MVA Conflict)

त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव सुचविण्यावर अद्याप एकमत झालेले नाही. आता तर एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याबाबत आरोप प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असा ठाकरे गटाच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे त्याला आणखी फोडणी मिळणार आहे.

काँग्रेसची पाठ मोडलेली तर शिवसेना झोपलेली : खा. कोल्हे

विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. पराभव आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो. त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा ‘बचेंगे तो और भी लढेंगे,’ असे  खा. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

आम्हाला सल्ला कमी द्यावा : विजय वडेट्टीवार

विधानसभेत ९ कोटींवर मतदान वाढले आहे. झोलझाल करून, ईव्हींएमच्या भरवशावर हे सरकार सत्तेत आले आहे. अमोल कोल्हेंना एवढेच सांगतो त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावा, आम्हाला सल्ला कमी द्यावा. जागावाटपामध्ये नेत्यांनी जो घोळ घातला त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ मिळाला, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते व माजी विधानसभा विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.

काँग्रेसने काही जागा सोडल्या असत्या तर… : राऊत

आमच्यात नक्कीच वाद सुरु होता. जागावाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. काँग्रेसला सर्वांत जास्त जागा हव्या होत्या. त्यांच्या सर्वांत कमी जागा निवडून आल्या. विदर्भात काही जागा सोडल्या असत्या तर चित्र काहीसे वेगळे दिसले असते, असे खासदार संजय राऊत म्हणाले. चंद्रपूरची जागा किशोर जोरगेवार राष्ट्रवादीतून लढणार होते. यासाठी १७ दिवस राष्ट्रवादीने प्रयत्न केले, पण काँग्रेसने जागा न सोडल्याने जोरगेवार भाजपात जाऊन जिंकले, असे प्रत्युत्तरही त्यांनी वडेट्टीवार यांना दिले. (MVA Conflict)

हेही वाचा :

मोदी म्हणाले, ‘मी देव नाही!’
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तर…

Related posts

ACB Raid : लाच घेताना दोघांना अटक

convocation : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी

Modi Podcast : मोदी म्हणाले, ‘मी देव नाही!’