‘महायुती’च्या काळात ड्रग्जमाफियांची चलती

मुंबई; विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष युती सरकारने मागील अडीच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्जमाफिया वाढले आहेत. तरुण पिढीला नशेत ढकलून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज धंदा खुलेआमपणे सुरू असून उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र बनवला आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. राजीव शुक्ला यांनी केला.

मुंबई कॉंग्रेस कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार शुक्ला म्हणाले, ‘काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर ड्रग्जच्या विळख्यातून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी कठोर कायदा करू. उडता महाराष्ट्र बनू देणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून भारतीय जनता पक्षाने तोडफोड करून सरकार बनवले, हा जनतेचा विश्वासघात आहे. युती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम केले असून, तब्बल २ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. पण जनतेला मात्र काहीच मिळलेले नाही.

भ्रष्टाचारासाठी भाजपा युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांनाही सोडले नाही.  महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने तो  पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि दोनच दिवसांत त्यांना भाजपने  सरकारमध्ये आणून अर्थमंत्री केले. आता ते ७० हजार कोटी रुपयांचे काय झाले ? महायुती सरकारने शेतकऱ्यांना काहीच मदत केली नाही. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण त्याला हमीभावही मिळत नाही. एक क्विंटल सोयाबिनसाठी ४ हजार रुपये खर्च येतो, पण बाजारात तेवढाही भाव मिळत नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयाबिनला ७ हजार रुपयांचा भाव दिला जाईल, असे राजीव शुक्ला यांनी सांगितले. यावेळी  राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, संदीप शुक्ला, प्रवक्ते निजामुददीन राईन आदी उपस्थित होते.

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी २८ डिसेंबरला मोर्चा

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ