मुंबई : वराह जयंती साजरी करण्याची मागणी राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या यामागणीवरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राणे यांच्यावर खुद्द सत्ताधारी पक्षातूनही टीका होत आहे. त्यामुळे महायुतीत तणावाची शक्यता व्यक्त होत आहे. (Mitkari slams Rane)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी तर नितेश राणे यांना वराह जयंतीची सुरूवात आपल्या घरापासूनच करावी, असा सल्ला दिला आहे.
मिटकरी यांनी म्हटले आहे की, “वराह जयंती साजरी करायची असेल तर नितेश राणे यांनी सर्वप्रथम त्यांच्या घरापासून सुरुवात करावी. त्यांनी काही वराह पकडून आणावे आणि त्यांचे पूजन करावे.’’ (Mitkari slams Rane)
‘‘वराह पूजन म्हणजे वराहाच्या पोस्टरचे पूजन नव्हे तर त्यांनी प्रत्यक्ष वराह पकडून आणावे आणि त्यांच्या घरातच त्याची पूजा करावी,” असा खोचक सल्हाही मिटकरी यांनी दिला आहे.
राणेंना पूर्वजांचा विसर पडलेला नाही : अंधारे
विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही नितेश राणे यांच्यावर टीकेचे फटकारे मारले आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर ‘‘नितेश राणे यांना आपल्या पूर्वजांचा विसर पडला नाही, ही चांगली गोष्ट आहे,’’ असे म्हटले आहे. (Mitkari slams Rane) “नितेश राणे यांना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही. त्यामुळेच तर ते हा सगळा उत्सव साजरा करू इच्छितात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यानिमित्ताने त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना दिवसभर वराह अवतारात काढायला हवा. या अवतारात ही जयंती त्यांनी साजरी करायला हवी. तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल,” असा हल्ला केला आहे.