मराठी साहित्या, तू कुठे जाशील ?

  • राजेंद्र साठे

आकडे फेकायचे आणि उत्सव साजरे करायचे, अशा मायावी वातावरणात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा इथे भरत आहे. आकड्यांतून येणारा उत्साह इथेही जाणवणार आहेच, पुढच्या वर्षी तो बहुदा टिपेलाही पोहोचणार आहे. परंतु राजकारणाने दाखवलेल्या मार्गावरून चाललेल्या समाजाला किमान स्पर्श करण्याइतपत ताकद आणि क्षमता मराठी साहित्यिकांत आणि ते प्रसवत असलेल्या साहित्यांत उरलीनुरली आहे का, साहित्याने आपले दिवेपण गमावले आहे का, हे प्रश्न या क्षणी कळीचे ठरावेत, संमेलनात सामील महानुभावांनी जाहीरपणे नाही जमल्यास, निदान आपापसात तरी एकमेकांना हे प्रश्न विचारून पाहावेत. तेवढेच आत्मपरीक्षणाचे आत्मसंवादाचे पुण्य पदरात पडावे…

“या सबंध लेखात पुस्तकांना निव्वळ पुस्तके म्हणून अस्तित्व नसते हे आम्ही समजून चाललो आहोत. चार कविता, दोन गोष्टी, एखादी कादंबरी कोणीही प्रामाणिक लेखक चांगली लिहील. परंतु, संबंध साहित्याच्या निर्मितीचा साकल्याने विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुस्तके ज्या व्यक्तिमत्वाची निर्मिती असते त्या (लेखकाच्या) व्यक्तिमत्वावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यक्तिमत्वाला पोखरणारा हा धोका म्हणजे भौतिक विकासाचा होय. पैसा, नोकरी व प्रतिष्ठेमुळे साध्य होणाऱ्या इतर भौतिक सवलती इत्यादी प्रचंड धोक्यापायी साहित्यिक व बुद्धिजीवी वर्गही साहित्याचे अवतारकार्यच विसरत चालला आहे.”

– हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का ? या लेखातून… (टीकास्वयंवर)

भालचंद्र नेमाडे यांनी १९६८ साली लिहिलेला व गाजलेला हा लेख आता कित्येक शतके जुना वाटावा अशी अवस्था आहे. काही नवतरुण वाचकांना तर, या लेखात कल्पिलेले, ‘लिहिण्याच्या अवस्थेतला खास आदिलेखक व वाचण्याच्या स्थितीत असलेला अस्सल वाचक’, हे कंतारासारख्या सिनेमांचे प्रेरणास्थान वगैरे आहेत की काय, असा संभ्रम व्हावा. अर्थात, तो लिहिला तेव्हाही नेमाडे यांनी आदिलेखक व अस्सल वाचक हे अभयारण्यातल्या प्राण्यांइतकेच कसेबसे वाचून राहिलेले जीव आहेत, असा निष्कर्ष काढला होता व शेवटी ‘प्रीझव्र्ह वाइल्ड लाइफ’ असा संदेश दिला होता. ते प्राणिसंरक्षण काही घडलेले नाही. (Marathi Literature)

मधल्या काळात ही आदिलेखकाची प्रतिमा घडवणारे खुद्द नेमाडे यांचेही खूप अवस्थांतर झाले आहे. सध्याचा काळ सनातनी संस्कृतीच्या ऐन पुनरुज्जीवनाचा आहे. तरीही इथे, कंदमुळे किंवा निव्वळ हवेवरच जगणारा जणू कोणी ऋषीच की काय अशा या (जीवन पणाला लावून लेखन करणाऱ्या) आदिलेखकाची कल्पना थारा मिळवू शकलेली नाही हेदेखील, तसे स्वाभाविकच असले तरी, नोंदवण्यासारखे आहे.

मुद्दा असा की, १९६८ मध्ये जवळपास कल्पनामात्रच असलेल्या आणि पुढची कित्येक वर्षे अनेकांना धाक वाटणाऱ्या या आदिलेखक नावाच्या इसमाचा मराठी साहित्याच्या प्रांतामध्ये आज आस किंवा भासही उरलेला नाही. संपत चाललेल्या २०२५मध्ये बसून ही नोंद आपण करीत असलो, तरी तो फारा वर्षांपूर्वीच संपून गेला असावा.

अवतार कोण, त्यांचे कार्य काय ? (Marathi Literature)

नेमाडे यांनी साहित्याचे अवतारकार्य असाही शब्दप्रयोग केला आहे. म्हणजेच, राम-कृष्ण इत्यादिकांप्रमाणे साहित्याकडे मनुष्यधर्माची ग्लानी घालवण्याइतकी शक्ती गृहीत आहे. त्यावरून १९६० च्या दशकात साहित्य ही किती म्हणून किमती वस्तू असावी व आज ५७ वर्षांनी तिचा किती म्हणून शक्तिपात झाला आहे, हे लक्षात येते. (Marathi Literature)

अर्थात, सहित्याला तेव्हा खूप उंच जागा असली तरीही नेमाडे यांनी तेव्हादेखील आदिलेखकांच्या उदाहरणस्वरुप घेतलेल्या नावांमध्ये हयात इसम कोणीही नव्हता हेही नोंदायला हवे. यामध्ये मराठी प्रांतातील तुकाराम हाच शेवटचा दिसतो. एकूण जगाचा वगैरे विचार करू जाता, त्यातल्या त्यात अलिकडचा डोस्टोव्हस्कीच दिसतो. आदिलेखक तर सोडाच, पण साधे लेखक व्हायला निघालो तरी, पीएच.डी.चे प्रबंध वाचावे लागणे, प्राध्यापक म्हणून तयारी करून शिकवणे, विद्यापीठातल्या राजकारणात अडकणे, दहिसरमध्ये फ्लॅट घेणे इत्यादी चकव्यांमध्ये आपण कसे अडकत गेलो, हे खुद्द नेमाडे यांनी अनेकदा सांगितले आहे.

यातले आदिलेखक हे प्रकरण बाजूला ठेवू. पण साहित्य, मग ते कसेही असो, समाजाच्या धारणेमध्ये फार मोक्याची भूमिका बजावू शकते, ही तेव्हाची श्रद्धा त्यावेळपर्यंत तरी सार्वत्रिक होती, हे या लेखावरून दिसते. मृत्यूंजय, छावा, ययाती, माणदेशी माणसं, व्यक्ती आणि वल्ली, काजळमाया, चक्र, माहीमची खाडी, गोलपिठा व्हाया कोसला येणेप्रमाणे वाचक कोणत्याही इयत्तेत असू शकतो. पण ज्याच्या त्याच्या आंतरिक संवेदनेसाठी ते ते साहित्यच समई, लामणदिवा, मशाल किंवा दीपगृहातला दिवा इत्यादी असू शकते यावर खांडेकरवादी, मौज स्कूलवाले ते नेमाडपंथी यांचे एकमत होते असे दिसते. (Marathi Literature)

आदिलेखकांचा दुष्काळ की पर्यावरणाचा ऱ्हास

आज साहित्याने हे दिवेपण गमावलेले दिसते. ‘चाळीस दिवसात चाळीस किलो वजन कमी करा’, ‘समाजात कसे वावरावे’ किंवा ‘शेवग्याची लागवड’ अशा पुस्तकांनी काही लोकांचे आयुष्य बदलून जातही असेल कदाचित. किंवा अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफिर’ वा शरद बाविस्करांचे ‘भुरा’ ही अनेकांना प्रेरणादायी वाटली असतील. पण, साहित्य म्हणून जे काही असते त्याविषयी, आज, वरच्या क्रमांकाचा आस्थेवाईकपणा पूर्वीसारखा उरलेला आहे, असे वाटत नाही. (Marathi Literature)

यासाठी वेळोवेळी इंटरनेट, टीव्ही, सिनेमा, ओटीटी, मोबाइल, यूट्यूब इत्यादींना सराईत दाखलेबाज म्हणून पकडून आणता येते. वाचनाचे, लेखनाचे, साहित्य प्रेमाचे मारेकरी हेच आहेत, असा सोपा तर्क केला जातो. अडचण अशी की, खूप काही बदलले आहे हे कळते. पण नेमके काय व कशामुळे याबाबत केवळ तर्कच करावे लागतात. यातले काही तर्क असे बहुदा लोकांना जगण्यासाठी साहित्य निरुपयोगी वाटू लागले असावे, किंवा त्यांची श्रद्धाच उडाली असावी, किंवा खरेदी आणि विक्रीच्या कसबांपलीकडे आयुष्यात त्यांना आणखी वेगळ्या कशाची गरज उरलेली नसावी, किंवा ‘जरीला’मधल्या त्या विद्यार्थ्याप्रमाणे ‘हल्ली मी नुसता असतो’, असे म्हणणाऱ्यांचीच बहुसंख्या झालेली असावी. किंवा प्रत्यक्ष जगण्याहून अधिक मोठे विधान करण्याची शक्ती साहित्यात उरलेली नसावी.

इथवर आल्यावर एक पेच असाही पडतो की, मराठीत व एकूणच सर्वत्र आदिलेखकांचा जो दुष्काळ पडला आहे, त्यामुळे साहित्याचे संस्कृतीकारणातील उंच स्थान व ती वैशिष्ट्यपूर्ण शक्ती हरवली आहे की, साहित्याची शक्ती कमी झाल्यामुळे आदिलेखक निर्माण होण्याचे पर्यावरण संपून गेले आहे? या हरेक तर्काचा शोध घेऊन याच्या शेवटापर्यंत जाण्याची सोपी युक्ती दिसत नाही. त्यामुळे त्याची जी काय कठीण युक्ती असेल ती आता शोधायची वेळ आलेली आहे.

१९६० चे महत्त्व (Marathi Literature)

मराठी साहित्यात १९६० या सनाला फारच महत्त्व आहे. त्यावर्षी मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य अखेर स्थापन झाले, हे तर एक कारण आहेच. त्यातूनच नंतर साहित्य संस्कृती मंडळ किंवा तत्सम उपक्रम सुरू झाले. साहित्य पुरस्कारही तेव्हाचेच असावेत. पण त्याहूनही एक महत्त्वाचे कारण आहे. मराठी साहित्यात साठोत्तरी नावाच्या एका पंथाचा मोठा दबदबा आहे. त्यांच्यामुळे साहित्याचे साठोत्तरी व साठपूर्ववाले असे सरळ विभाग पडतात.

नेमकी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वादळानंतर १९६० च्या बंडाची प्रसिद्ध वावटळ उठल्याने ही जणू त्या वादळाचाच परिणाम असावा असा समज झाला. खरे तर ही मारामारी कलावादी, रंजनवादी इत्यादी साहित्यातल्या प्रस्थापितांपुरती होती. पण स्वातंत्र्य, काँग्रेस इत्यादींची झिलई उडू लागणे आणि वाढत्या नागरी बकालीमध्ये परात्मता फोफावणे यांचे, मर्डेकर, गाडगीळ (किडलेली माणसे), भाऊ पाध्ये, नेमाडे अशा अनेकांच्या लिखाणाशी असे काही जुळून गेले, की हे साठोत्तरीवाले गांधी, नेहरु, लेनिन, माओ यांनाही छेद देऊन जाणारी कोणती तरी नवी नैतिकता जन्माला घालत आहेत असा समज बळावला. यापाठोपाठ आलेले दलित साहित्य, पँथरचे आंदोलन इत्यादींमुळे तर हा संबंध आणखी घट्ट झाला. (वात्रट शक्यता अशी की, चीनशी आपले युद्ध झाले नसते, तर माओच्या शंभर फुले उमलू द्यावाल्या सांस्कृतिक क्रांतीशी आपला संबंध जुळला असता.)

या धामधुमीत एक धारणा बळकट होत गेली की, जुना आदर्शवाद ही लबाड, भंपक, टाकाऊ वस्तू आहे. बाकी काही नाही तरी तो पहिल्यांदा टाकायला हवा. हे सर्व साठच्या बंडखोर लेखकांमुळे झाले असे नव्हे. त्यांची तेवढी ताकद त्याहीवेळी नव्हती. पण समाजाची तशी धारणा घडत असताना त्यांनी आपापली अक्षरे त्यात टाकली. तिथपासून नंतर देशासोबत महाराष्ट्रानेही १९७५, ८४, ८९, ९२, २००१, २०१४, २२, २४ आणि २०२५ असा प्रवास केला. साठोत्तरी किंवा मराठी साहित्याच्या एक-दोन मोठ्या भानगडी झाल्या त्या इथेच. (Marathi Literature)

उलट्या पावलाची भुते

१९८०, ९०, २००० या काळात बऱ्याच खळबळी माजल्या, तरी इथली लोकशाहीची डोलकाठी आणि तिच्यावर लटकावलेले समता वगैरेंचे झेंडे हे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात काशीयात्रेला निघालेल्यांच्या काठीवरच्या सोन्याइतकेच निश्चित होते. त्यांना पाडू पाहणाऱ्या ठगांचा बंदोबस्त झालेला आहे, अशा समजात सर्वजण होते. प्रत्यक्षात फार झपाट्याने डोलकाठ्या खेचल्या गेल्या आणि ठग आणि पेंढाऱ्यांची निशाणे त्यावर चढत गेली. लोकशाही व समाजवादाच्या दिशेने निघालेल्यांची पावले भुताची ठरली व उलटी पावलेवाल्यांचे बहुमत आवाजी मतदानाने संमत झाले.

१९६० मध्ये आदर्शवादाचा नॉशिया नेमका पकडणाऱ्या साठोत्तरी व बाकीच्या साहित्याला या बदलाने मात्र चकवा दिला. (की ते या भानगडीत जायला घाबरले?) महानुभाव परंपरा, वारकरी यांच्याबद्दल कळवळ्याने लिहिणाऱ्यांच्या चिमटीतून वारकरी ते धारकरी हा प्रवास निसटून गेला. शिवाजी, तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, गांधीप्रणित माणुसकी थेट विकून टाकण्याच्या उद्योगाचा डाव्या चळवळींना पत्ता लागला नाही. पण त्याचा थांग लावण्याचा प्रयत्न साहित्यात अजून सुरुदेखील झालेला दिसत नाही. (Marathi Literature)

आज गोहत्याबंदीच्या नावाने खून पाडणाऱ्यांचे किंवा मुस्लिम बायकांवर बलात्कार करणाऱ्यांचे सत्कार होतात, वेदमंत्रांची घोकंपट्टी करून दाखवणारे किंवा राम, राम असे लिहून वह्या भरून टाकणारे नवीन राष्ट्र घडवत आहेत, असे मानले जाते किंवा गुढीपाडव्याला मोटारसायकलींवरून शोभायात्रा काढणाऱ्या महिला म्हणजेच स्त्रीसमानता असे मानले जाते. क्रूरपणा, निर्बुद्धपणा आणि उन्माद अद्भुत पातळीला जाऊन पोचलेल्या या समाजामध्ये आपले साहित्य कधी व कशी डुबकी मारते आणि त्याच्याशी कोणते नाते जोडते, हा आजचा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. भीषण बदलांच्या वाऱ्यांमध्ये मराठी साहित्याने आजवर दाखवलेली स्थितप्रज्ञता विलक्षण आहे. इथून पुढे ती मोडायची की ‘अंगावरून वारं गेलेल्या’ अवस्थेत पडून राहायचे याचा निर्णय आपोआप होणारा नाही, सक्रीयपणे तो करावा लागणार आहे.

 (राजेंद्र साठे हे लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आहेत. संपर्क- satherajendra@gmail.com, ७०४५१ ५४३५४)

(साभारः समतावादी मुक्त संवाद पत्रिका)

Related posts

विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू करावे : वासुदेव कुलकर्णी

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?