मुंबई : प्रतिनिधी : मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलकांनी अंतरवाली सराटीतून राजधानी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मोर्चामध्ये ठिकठिकाणचे आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. (Maratha March Awhad)
मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून आझाद मैदानात ते बेमुदत उपोषण करणार आहे. आझाद मैदानावर त्यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. गुरुवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी ते मुंबईत पोहोचणार आहेत. अंतरवाली सराटीतून त्यांनी मुंबईकडे कूच केल्यानंतर गावागावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षण आंदोलनाविषयी भूमिका व्यक्त केली आहे. (Maratha March Awhad)
ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाने आत्तापर्यंत काढलेले सगळे मोर्चे हे आदर्श मोर्चे होते. जगभरात त्यांची चर्चा झाली. आताही ते त्यांच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतील तर त्यांना ते करण्याचा हक्क आहे. सरकार हे मायबाप असतं, त्यांनी त्या भूमिकेतून मराठा समाजाच्या मागण्यांकडे पाहिले पाहिजे.’’
लक्षात घ्या, राज्यातील एक मोठ्या समाजावर तुम्ही अन्याय करू शकत नाही ना त्यांच्यासोबत पक्षपातीपणाने वागू शकता..!, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
तर आंदोलन अपरिहार्य : जरांगे
दरम्यान, जरांगे यांनी म्हटले आहे, ‘‘समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्या, आणि गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यावा, त्यांनी जर आज सरसकट आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळू आणि मागे जाऊ. मात्र मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही मुंबईत येणारच आणि आझाद मैदानात आंदोलन करणार,’’ असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.