Manisha : कुस्तीपटू मनीषाला सुवर्ण

Manisha

अम्मान : आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा मागील चार वर्षे सुरू असणारा सुवर्णपदकांचा दुष्काळ महिला कुस्तीपटू मनीषा भानवालाने शनिवारी संपवला. या स्पर्धेमध्ये महिलांच्या ६२ किलो गटात मनीषाने अंतिम सामन्यात उत्तर कोरियाच्या ऑक जू किमवर ८-७ अशी मात करून सुवर्णपदक जिंकले. याबरोबरच, भारतीय महिलांनी या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व तीन ब्राँझ अशा एकूण पाच पदकांची कमाई केली. (Manisha)

जॉर्डनमधील अम्मान येथे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीपासूनच २८ वर्षीय मनीषाने वर्चस्व राखले. पात्रता व उपांत्यपूर्व फेरीचे सामने मनीषाने एकही गुण न गमावता एकतर्फी जिंकले. उपांत्य फेरीमध्ये किर्गिझस्तानच्या कॅल्मिरा बिलिमबेकोवाला ५-१ असे नमवून मनीषाने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात एकावेळी मनीषा २-७ अशा पिछाडीवर होती. मात्र, निर्णायक क्षणी खेळ उंचावून मनीषाने सलग सहा गुण मिळवले व सुवर्णपदक निश्चित केले. मनीषाचे हे पहिलेच आशियाई सुवर्णपदक आहे. यापूर्वी, तीनवेळा ती या स्पर्धेमध्ये ब्राँझपदकाची मानकरी ठरली होती. त्याचबरोबर, मनीषामुळे भारताला २०२१ नंतर प्रथमच या स्पर्धेत सुवर्णतक्त्यात स्थान मिळाले. (Manisha)
तत्पूर्वी, या स्पर्धेमधील महिलांच्या ७६ किलो गटात भारताच्या रितिका हुडाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चुरशीच्या अंतिम सामन्यात रितिकाला किर्गिझस्तानच्या ऐपेरी मेदेत कायझायकडून ६-७ असा निसटता पराभव पत्करावा लागला. याशिवाय, अंतिम पंघल, मुस्कान आणि मानसी लॅथर यांनी ब्राँझपदक मिळवले. २० वर्षांखालील गटात भारताची पहिली विश्वविजेती असणाऱ्या अंतिमने ५३ किलो गटातील ब्राँझपदकाच्या लढतीत तैपेईच्या मेंग एच. सिएहला १०-० असे हरवले. मुस्कानने ५९ किलो गटात मंगोलियाच्या अल्तजिन तोगतोखचा ४-० असा पराभव करून ब्राँझपदक निश्चित केले. ६८ किलो गटामध्ये १८ वर्षीय मानसीने कझाखस्तानच्या आयरिना कॅझुलिनावर १२-२ अशी मात करत ब्राँझपदकाची कमाई केली. (Manisha)

हेही वाचा :
 चॅपमनच्या शतकाने न्यूझीलंडचा विजय

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना