महाराणी ताराबाई जैन समाजाच्या: पद्मसागर यांच्या वक्तव्याने संतापाची लाट

Maharani Tarabai of the Jain community

मुंबई : प्रतिनिधी : महाराणी ताराबाई यांच्या जैन समाजाच्या होत्या असे वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाचा इतिहास मोडतोड करण्याच्या षढयंत्रात जैन मुनीनी सहभागी होऊ नये, अशी टीका इतिहास संशोधकांनी केली आहे.

मुंबईत जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी एका कार्यक्रमात महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या होत्या. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी त्यांचा जन्म जैन समाजात झाला. छत्रपती संभाजीमहाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराणी यांनी औरंगजेबाशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणले. त्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत. त्यांनी कोल्हापुरच्या गादीची स्थापना केली असे वक्तव्य केले. (Maharani Tarabai of the Jain community)

वादग्रस्त विधाने करण्याचा खोडसाळपणा करु नका : मालोजीराजे

…. जैन मुनी पद्मसागर यांच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती घराण्यातील माजी आमदार मालोजीराजे यांनी पद्मसागर यांचे वक्तव्य खोडसाळपणाचे आहे अशी टीका केली आहे.  मालोजीराजे म्हणाले, करवीर राज्य संस्थापिका महापराक्रमी छत्रपती महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या महाराणी होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्यानंतर त्यांनी अतिशय नेटाने आणि ताकतीने स्वराज्य सांभाळले. मुघलांना सळो की पळो करुन सोडले होते. त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. याचा अर्थ त्या क्षत्रिय मराठा कुळातीलच आहेत हे स्पष्ट आहे. तरीही जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराबाई या  जैन समाजातील असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. हा निव्वळ खोडसाळपणा आहे. वादग्रस्त विधान करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जैन समाजाविषयी आपल्याला आदर आहे. पण, आचार्य नयन पद्मसागर यांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये. चुकीचा इतिहास पसरवू नये. (Maharani Tarabai of the Jain community)

मराठ्यांच्या इतिहासात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही: इंद्रजीत सावंत

…इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी इतिहासात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही असे ठणकावले आहे. ते म्हणाले, महाराणी ताराबाई या मराठा आहेत याबाबत कुणाचीही दुमत नाही. यापुढे नसणार आहे.  त्या मराठा असल्याचे शेकडो पुरावे आहेत. महाराणी ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनी  महापराक्रम गाजवला आहे. असे महापराक्रमी आपल्या जातीत, धर्मात असावा असे असे वाटणं साहजिक आहे. भारतात आणि भारताबाहेर त्यांचे आकर्षण आहे. या महापुरुषांचा इतिहासात बदल करण्याचा आधिकार कुणाला नाही. जैन मुनी पद्मसागर यांना आचार्य पदवी दिली आहे.  जैन धर्मात सत्य, अहिंसा संयम ही तत्वे आहेत. इतिहासाचा अभ्यास न करता जैन आचार्यांनी  जाती धर्मात कलह होऊ नये अशी वक्तव्ये करु नयेत.  मराठांच्या इतिहासाची वारंवार मोडतोड करण्याचे षढयंत्र सुरू आहे. या  षढयंत्रणाचा भाग जैन आचार्यांनी होऊ नये. महाराष्ट्राचा इतिहास आहे तसा समजून घेतला पाहिजे.  (Maharani Tarabai of the Jain community)

जैन मुनींचे वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजाबदारपणाचे: संभाजीराजे

.माजी खासदार संभाजीराजे यांनीही जैन मुनीनी केलेले वक्तव्य धादांत तथ्यहीन आहे अशी टीका केली. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्यरक्षिका करवीरसंस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेले वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजाबदारपणाचे आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर