मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षीय बैठकांना प्राधान्य देत असल्याने मंगळवारी विधानसभेत कोरम नव्हता. त्याला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यामुळे तालिका अध्यक्ष यांनी विधानसभेचे कामकाज आजच्या दिवसासाठी स्थगित केले. (Legislative Assembly proceedings adjourned due to lack of quorum)
विधानसभेत विरोधी पक्षांचा नियम २९३ अन्वये महत्त्वाचा प्रस्ताव चर्चेसाठी होता. मात्र, सभागृहात आवश्यक सदस्य संख्या नसल्याचे समोर आले. भाजपची महत्त्वाची बैठक सुरू असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे बहुतांश आमदार आणि मंत्री सभागृहात अनुपस्थित होते. यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘ विरोधी पक्षाचा महत्वाचा प्रस्ताव होता. अशा वेळी मंत्री उपस्थित नाही. विधानसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अधिकारी उपस्थित नसतात. मग जबाबदारी कुणाची आहे? विधानसभेचे कामकाज हे नियमानुसार चालले पाहिजे, अशी भूमिका मांडली. वडेट्टीवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तालिका अध्यक्षांना दोन वेळा प्रत्येकी १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब करावे लागले. मात्र, तरीही कोरम पूर्ण न झाल्याने अखेर आजच्या दिवसाचे कामकाज पूर्णपणे स्थगित करण्याची नामुष्की ओढवली. (Legislative Assembly proceedings adjourned due to lack of quorum)