कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला ‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ हा ग्रंथ देशाच्या आत्म्याशी संवाद साधणारा तसेच भावी पिढीच्या चारित्र्यनिर्मितीचा दीपस्तंभ ठरणारा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. (Launch of the book ‘Gatha Aplya Swatantryasainikanchi’)
शिवाजी विद्यापीठात ‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, जनसंपर्क कक्ष आणि कला व साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. अरुण भोसले, गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने प्रमुख उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठाने आपल्या ‘शिववाणी’ युट्यूब वाहिनीवरुन ‘गाथा स्वातंत्र्यसैनिकांची’ ही दैनंदिन मालिका वर्षभर सलग चालविली. या मालिकेतील स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकार्याचे शब्दांकन करून त्याचे ग्रंथरुपात संपादन करण्यात आले आहे. डॉ. अविनाश पाटील आणि डॉ. दत्तात्रय मचाले यांनी संपादन केले आहे. (Launch of the book ‘Gatha Aplya Swatantryasainikanchi’)
स्वातंत्र्य चळवळ नैतिक मुल्यांची क्रांती होती
डॉ. साळुंखे म्हणाले, स्वातंत्र्य चळवळ ही केवळ राजकीय लढाई नव्हती, तर ती नैतिक मूल्यांची क्रांती होती. सत्य, अहिंसा, स्वराज्य, शिक्षण, संविधान आणि राष्ट्रप्रेम यांसारखी मूल्ये स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवली. त्यामुळे त्यांचा इतिहास नव्या पिढीला केवळ भूतकाळाची माहिती देणारा न राहता वर्तमानातील मूल्यजाणीव आणि भविष्याची दिशा देणारा ठरला पाहिजे. इतिहासाचे रोमँटीकरण न करता तो वास्तववादी असणे आवश्यक आहे; कारण इतिहास हा भूतकाळाचा केवळ संग्रह नसून भविष्याला दिशा देणारा स्रोत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढा अभिजनांनी नव्हे तर सामान्य माणसांनी घडविला.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. अरुण भोसले म्हणाले, स्वातंत्र्याचा संघर्ष आणि लढा हा प्रस्थापित किंवा अभिजनांनी नव्हे, तर जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या सामान्य माणसांनी घडविला आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात राष्ट्रीय पातळीवरील नेते आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या कार्याला प्रारंभी अधिक महत्त्व मिळाले; मात्र गावागावांत, खेड्यापाड्यांत चेहराविहीन, आवाजहीन असंख्य सामान्य माणसांनी केलेला त्याग आणि दिलेले बलिदान इतिहासाच्या मुख्य प्रवाहात पुरेसे नोंदले गेले नाही. ‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ या ग्रंथाच्या माध्यमातून अशाच ज्ञात-अज्ञात, न-नायक ठरलेल्या सामान्य स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे दस्तावेजीकरण झाले असून त्यांच्या मनोगतांना शब्द आणि त्यांच्या कार्याला इतिहासात स्थान मिळाले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ३६६ ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यगाथा संशोधन, मुलाखती आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे नोंदविणारा हा ग्रंथ मातीतील या न-नायकांच्या असामान्य पराक्रमाला दिलेली मानवंदना आहे. सामान्य माणूस हाच स्वातंत्र्यलढ्याचा खरा नायक होता, ही जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रकल्पातून झाले आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव नव्या पिढीला करुन देण्याची गरज
देशाला मिळालेले स्वातंत्र्य सहज, सोपे किंवा स्वस्तात मिळालेले नाही; त्यामागे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे त्याग, समर्पण आणि बलिदान आहे, याची जाणीव नव्या पिढीला करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी अध्यक्षीय मनोगतात केले.
यावेळी या उपक्रमाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. धीरज शिंदे, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. भरतभूषण माळी, सातारा जिल्हा समन्वयक डॉ. अजितकुमार जाधव, तसेच, प्राचार्य विलास पवार, चित्रकार राहुल रेपे, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, निवेदक डॉ. सुस्मिता खुटाळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या तिन्ही जिल्ह्यातील नोंदलेखकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्प व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.कार्यक्रमास डॉ. इस्माइल पठाण, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. भारती पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, डी.जी. भास्कर यांच्यासह विविध अधिविभागांसह महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय आणि नातेवाईक उपस्थित होते. (Launch of the book ‘Gatha Aplya Swatantryasainikanchi’)