पाटणा : राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसाबळे यांनी राज्यघटनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांचे वक्तव्य हे लोकशाही मूल्यांवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Lalu slams Hosabale)
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलाताना दत्तात्रय होसाबळे यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दांचा आढावा घेण्याची मागणी केली. तसेच हे दोन्ही शब्द हटवावेत, असे ते म्हणाले. हे शब्द आणीबाणीच्या काळात समाविष्ट केले गेले होते आणि आता ते समकालीन भारताचे प्रतिबिंब त्यात नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा लालू प्रसाद यांनी जोरदार समाचार घेतला.(Lalu slams Hosabale)
होसाबळे म्हणाले, ‘‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द ठेवावेत की नाही यावर चर्चा झाली पाहिजे. मी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या इमारतीत म्हणत आहे. त्यांनी लिहिलेल्या मूळ संविधानाच्या प्रस्तावनेत या संज्ञा समाविष्ट नव्हत्या.’’
दिल्लीतील एका कार्यक्रमात होसाबळे यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांनी तीव्र टीका केली आहे.(Lalu slams Hosabale)
लालू प्रसाद यादव म्हणाले, ‘‘ संविधानाला हात घालण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही.’’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये लालूंनी आरएसएसच्या प्रस्तावाचा निषेध करत म्हटले आहे की, ‘‘देशातील सर्वात मोठी जातीयवादी आणि द्वेषपूर्ण संघटना, आरएसएस, संविधान बदलण्याबद्दल बोलली आहे. या विकृत लोकांच्या मनात आणि विचारांमध्ये सतत लोकशाही आणि बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल इतका द्वेष का आहे?’’