अलीगढः काही वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळी घालण्याचा देखावा करणारी हिंदू महासभेची नेता पूजा शकुन पांडेय आणि तिच्या पतीवर एका व्यापा-याच्या खुनाची सुपारी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लेडी नथुराम गोडसे म्हणून ओळखली जाणा-या पूजावर गांधी जयंतीदिनीच गुन्हा नोंद झाला, हा एक अनोखा योगायोग मानला जातो. (Lady Nathuram Godse)
उत्तर प्रदेशातील अलीगढच्या खैर भागात व्यापारी अभिषेक गुप्ता यांची बसस्थानकावर गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्याला अटक केली. मोहम्मद फजल नावाच्या शूटरने आपण कोणाच्या सांगण्यावरून हत्या केली तेही उघड केले आहे. ज्याचा खून झाला, तो व्यापारी अभिषेक गुप्ता संशयित पूजाला लेडी नथुराम गोडसे असे संबोधत होता. (Lady Nathuram Godse)
अभिषेक गुप्ता हा अलीगढच्या खैर भागातील तरुण व्यापारी होता. टीव्हीएस बाईकचे शोरूम चालवत होता. २६ सप्टेंबर २०२५ रोजी ते वडील व चुलत भावासह बस पकडण्यासाठी खेरेश्वर चौकात गेले. तिथे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, हिंदू महासभेच्या नेत्या पूजा शकुन पांडेय आणि त्यांचे पती अशोक पांडेय यांच्यासोबत अभिषेक यांचा पैशावरून वाद सुरू होता. त्यावरून त्यांना ब्लॅकमेलही केले जात होते. कुटुंबीयांचा संशय आहे की, या दाम्पत्यानेच अभिषेकची हत्या करवली. (Lady Nathuram Godse)
अलीगढच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार२८ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता दोन बाईकस्वारांनी अभिषेक गुप्ताची हत्या केली. तपासानंतर गांधीबाग पोलीस ठाण्यात अशोक पांडेय आणि पूजा शकुन पांडेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Lady Nathuram Godse)
घटनेनंतर पोलिसांनी खैर ते सिकंदराराव मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. साक्षीदारांची चौकशी केली. यानंतर फजल नावाचा शूटर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. चौकशीत त्याने कबुल केले की, अभिषेकच्या हत्येसाठी त्याला तीन लाख रुपयांची सुपारी मिळाली होती. त्यातील एक लाख रुपये अॅडव्हान्स दिले गेले होते.
फजलला हे पैसे पूजा शकुन पांडेय आणि अशोक पांडेय यांनी दिले होते. पोलिस तपासात उघड झाले की, गेल्या दोन महिन्यांत फजल आणि या दाम्पत्यामध्ये तब्बल ३८ वेळा फोनवरून संपर्क झाला होता. फजलने पोलिसांना सांगितले की, तो पूजा आणि तिच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखत होता. त्यांच्या अनेक कामांत मदतही केली होती. या जुन्या ओळखीवरच त्याला सुपारी देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक आणि पूजाने फजलला एका माणसाच्या खुनासाठी शूटरची मागणी केली होती. फजलने त्यांना आसिफ नावाच्या व्यक्तीशी भेट घडवून आणली. या भेटीत अभिषेकचा फोटो दाखवून तीन लाख रुपयांत सुपारी ठरली. त्यातील एक लाख रुपये रोख देण्यात आले. त्यानंतर त्यांनी रेकी केली पण खैरमध्ये संधी मिळाली नाही. अखेर जेव्हा अभिषेक बस पकडण्यासाठी खेरेश्वर चौकात आले तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी अशोक पांडेयला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तर पूजा शकुन पांडेय फरार असून तिचा शोध सुरू आहे. या हत्याकांडात आणखी एक शूटर आसिफचा शोध घेतला जात आहे.
पूजा शकुन पांडेय कोण आहे?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पूजाच्या अकाउंटमध्ये तिला महामंडलेश्वर डॉ. अन्नपूर्णा भारती म्हटले आहे. ती निरंजनी अखाड्याशी संलग्न असून हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव, सनातन हिंदू सेवा संस्थेची न्यासी आणि हिंदू न्यायपीठाची पीठाधीश्वर आहे. तिच्या अकाउंटवर एक पिन केलेली पोस्ट आहे. ज्यात ती डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांच्यासोबत दिसते. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे – “फक्त घंटा वाजवून उपयोग नाही, धर्माचे रक्षण करणे आणि धर्मासाठी संघर्ष करणे हेच खऱ्या संताचे काम आहे.”
पूजा शकुन पांडेय आधीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. एकदा त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला गोळी झाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यात ‘गोडसे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यांचा पती अशोक पांडेय हे हिंदू महासभेचा राष्ट्रीय प्रवक्ता आहेत.