बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री बदलाचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. (K’taka CM)
दुसरीकडे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर उत्तर देताना मी आणि डीके शिवकुमार एकत्र काम करत आहे, दोघे एकत्र घट्ट बांधले गेलो आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी (३० जून) सांगितले की अशा बाबींवर निर्णय घेणे पक्षाच्या हायकमांडचे काम आहे. यासंदर्भात कोणीही अनावश्यक समस्या निर्माण करू नयेत. (K’taka CM)
ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे, असा दावा राज्यातील काही काँग्रेस नेते करत आहेत, त्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता खरगे उत्तर देत होते.
ते म्हणाले, ‘‘ही बाब हायकमांडच्या हातात आहे. हायकमांडमध्ये काय निर्णय होईल ते इथे कोणीही सांगू शकत नाही. हे हायकमांडवर सोपवले आहे आणि हायकमांड यांना पुढील निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु अनावश्यकपणे, कोणीही समस्या निर्माण करू नये.’’ असे त्यांनी बेंगळुरूमध्ये पत्रकारांना सांगितले.
२०२३ मध्ये दक्षिणेकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांना प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री देण्यात येईल, अशी अटकळ होती. पक्षाने आतापर्यंत हा दावा मान्यही केला नाही अथवा फेटाळलाही नाही. सध्या सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत आणि शिवकुमार उपमुख्यमंत्री आहेत.
दरम्यान, कर्नाटकचे प्रभारी काँग्रेस सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला हेही बेंगळुरूमध्ये आहेत. सत्ताधारी पक्षात नेतृत्व बदलाबाबत असंतोष आणि अटकळ सुरू असताना त्यांनी पक्षाच्या आमदारांची भेट घेतली. (K’taka CM)
त्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना श्री. खरगे म्हणाले, ‘‘सुरजेवाला आले आहेत. त्यांच्या अहवालाच्या आधारे आणि त्यांना मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, आम्ही कोणती पावले उचलायची ते ठरवू.’’
खरगे यांच्या भूमिकेवर टीका करताना विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी ‘अपघाती’ अध्यक्ष अशी त्यांची संभावना केली. तसेच, ‘‘जर खरगे पक्षाचे हायकमांड नसतील तर कोण?,’’ असा सवालही उपस्थित केला.
हेही वाचा :
बहुमताचा माज मराठी भाषिकांनी उतरवला
अहवाल काहीही येवो, हिंदी लादू देणार नाही : राज