मुश्रीफांसाठी थोडा सा गम, थोडी खुशी

Kolhapur District Municipal Elections

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हयात महायुतीला घवघवीत यश मिळाले. सर्वात महत्वाचे म्हणजे मोठा भाऊ असलेल्या भाजपपेक्षा शिवसेना शिंदे गटाने जिल्हयात बाजी मारली. शिवसेना शिंदे गटाने स्थानिक आघाडी करत  जयसिंगपूर, हातकणंगले, कुरुंदवाड, मुरगुड या चार नगरपालिकेवर  भगवा फडकावला. कमी लोकसंख्या असलेल्या चंदगड, आजरा आणि हुपरी नगरपालिकेवर भाजपने विजय संपादन केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल नगरपालिकेच्या निवडणूकीत गेली दहा वर्षे कट्टर वैरी असलेल्या हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी एकहाती सत्ता मिळवली. गडहिंग्लजमध्ये मंत्री मुश्रीफांनी बाजी मारत मोठ्या महानगरपालिकेवर सत्ता मिळवली. महाविकास आघाडीला माफक यश मिळाले असले तरी विधानसभेत शुन्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाने पेठ वडगाव आणि शिरोळ नगरपालिकेत विजय मिळवल्याने पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाने पन्हाळा गिरीस्थान आणि मलकापूर नगरपालिकेत सत्ता कायम राखली आहे.

  • सतीश घाटगे

संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलेल्या कागल नगरपालिकेत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे गटाने एकहाती सत्ता प्राप्त केली. वीस पैकी वीस जागा जिंकून कागलचे सिंकदर असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सिद्ध केले. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली असली तरी कागलच्या राजकारणातील कट्टर वैरी असलेले मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुश्रीफ यांचे सेनापती म्हणून ओळख असलेल्या भैय्या माने यांच्या पत्नी  सविता प्रताप माने या विजयी झाल्या. समरजित घाटगे यांच्याशी युती झाल्याने कागलचा विजय सुकर झाला. मतदानापूर्वीच मुश्रीफ यांच्या सुनबाई बिनविरोध निवडून आल्या होत्या. शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी विजयासाठी जीवाचे रान केले पण मुश्रीफ घाटगे गटाने एकहाती सत्ता मिळवण्यात दणदणीत यश मिळवले. (Kolhapur District Municipal Elections)

कोल्हापूर जिल्ह्यात पहिला निकाल  लागला तो मुरगुड नगरपालिकेचा.  शिवसेना शिंदे गटाच्या सुहासिनी प्रविणसिंह पाटील या नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्या आहेत. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना पक्षाची युती असून शिवसेनेचे माजी खासदार संजयसिंह मंडलिक, माजी आमदार संजयसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यात आली. या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुरगडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे पराभूत झाले आहेत. गेल्यावेळी ते शिवसेनेचे नगराध्यक्ष होते. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीही नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. भाजप शिवसेना युतीचे १६ उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना केवळ चार जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी या निवडणुकीत मोठ्या घडामोडी झाल्या. मुश्रीफ गटातून माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील भाजप पक्षात गेले. पण मुरगुडवर मंडलिक गटाचे वर्चस्व असल्याने प्रविणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी पाटील शिवसेनेकडून लढल्या आणि जिंकल्याही.  

गडहिंग्लज नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने नगराध्यक्षपदासह तब्बल १७ जागांवर दणदणीत विजय मिळविला. विरोधी महायुतीला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मुश्रीफांविरोधात जनता दल, भाजप, जनसुराज्य, शिवसेना (शिंदे) या महायुतीचे आव्हान होते. राष्ट्रवादीचे महेश तुरबतमठ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. जनता दलाच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्न केला. त्या स्वत: निवडून आल्या. पण विरोधी आघाडी नेस्तानाबूत झाल्याचे चित्र गडहिंग्लजमध्ये पहायला मिळाले.

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. ही नगरपरिषद जनसुराज्य पक्षाचा बालोकिल्ला म्हणून ओळखली जाते.  निवडणूकीपूर्वी २० पैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.  १६ जागांवर जनसुराज्य, भाजप आणि स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाली आहेत. आमदार विनय कोरे यांनी आपला बालेकिल्ला राखत पन्हाळ्यावर जनसुराज्यचा पुन्हा गुलाल उधळला. (Kolhapur District Municipal Elections)

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती आणि भाजप युतीच्या रश्मी कोठावळे नगराध्यक्षपदाच्या विजयी झाल्या. आमदार विनय कोरे आणि भाजपने एकत्रित निवडणूक लढवली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे दहा उमेदवार विजयी झाले. शिवसेनचे माजी आमदार सत्यजीत पाटील आबा यांनी कडवी लढत दिली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सात नगरसेवक निवडून आले. जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मिळालेले हे थोडेफार यश पहायला मिळाले.

हातकणंगले नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित पाटील मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला सहा, काँग्रेसला पाच, शिवसेना ठाकरे गटाला एक, भाजपला दोन तर तीन अपक्ष निवडून आले आहेत. हातकणंगलेच्या विजयात खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले यांचा मोलाचा वाटा होता. (Kolhapur District Municipal Elections)

राज्यात प्रथमच चंदगड नगरपरिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पण अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी बाजी मारत चंदगडमध्ये भाजपचे कमळ फुलवले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार राजेश पाटील आणि नंदिनी कुपेकर यांना एकत्र केले होते पण दोन्ही राष्ट्रवादीची इथे डाळ शिजली नाही. शिवाजीराव पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असून या निवडणुकीत फडणवीस यांनी सभा घेतली. या सभेचे फळ भाजपला मिळाले. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनील काणेकर विजयी झाले. नगरपालिकेत भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँगेस व मित्रपक्ष राजर्षी शाह आघाडी आठ जागावर विजयी झाले आहेत. एक अपक्ष उमेदवार विजय झाला आहे. 

शिरोळ नगरपालिका निवडणूक हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अशोकराव माने आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मोठा धक्का बसला आहे. अशोकराव माने यांच्या सुनबाई भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार सारिका अरविंद माने या पराभूत झाल्या आहेत. आमदाराचे पुत्र अरविंद माने हेही नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दत्त सहकारी साखर कारखान्याचे काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि अनिल यादव यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या योगिता कांबळे विजयी झाल्या आहेत. या नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अशोकराव माने यांची आघाडी तुल्यबळ होती. पण काँग्रेसने दोन्ही आमदारांची धोबीपछाड करत काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात अस्तित्व राखले.

जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असलेल्या जयसिंगपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत राजर्षी शाहू आघाडीच्या संजय पाटील यड्रावकर यांनी बाजी मारली आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे ते बंधू आहेत. यड्रावकरांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट विरोधात होते. यड्रावकरांच्या विरोधात काँग्रेस भाजप एकत्र आली होती. पण यड्रावकरांच्या करिश्मापुढे विरोधी आघाडी फिकी पडली.

हुपरी नगरपालिकेमध्ये भाजप युतीचे उमेदवार आरपीआयरचे मंगलराव माळगे विजयी झाले. हुपरीवर भाजपने सत्ता मिळवताना त्यांचे १८ उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा जिंकून जिल्ह्यात आपले अस्तित्व दाखवले. हुपरीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपला प्रभाव दाखवता आला नाही. मंगलराव माळगे यांनी यापूर्वी हुपरीचे सरपंच म्हणून कार्य मतदारांना भावले. भाजपने ही जागा आरपीआयला दिली होती. पण माळगे कमळाच्या चिन्हावर लढत विजयी झाले.

पेठ वडगावमध्ये काँग्रेस प्रणित यादव गटाच्या  विद्याताई पोळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत २२६३ मतांनी विजयी झाल्या आहेत. विद्याताई पोळ दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी यादव आघाडीचे १५ उमेदवार विजयी झाले तर जनसुराज्य सालपे आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले.

कुरुंदवाड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शाहू आघाडीच्या मनिषा डांगे विजयी झाल्या. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्याच विधानसभा मतदारसंघावर नगराध्यक्ष पद जिंकून मतदारसंघावर दावा भक्कम केला. मनिष डांगे या भाजपमधून शाहू आघाडीत आल्या होत्या. सध्या यड्रावकर हे शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने चौथ्या नगरपालिकेवर शिंदे गटाचा झेंडा लागला.

आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे, ताराराणी आघाडीचे उमेदवार अशोक चराटी विजयी झाले. दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचा जुना गट एकत्र येऊन चराटी यांनी बाजी मारली. अशोक चराटी यांना ४२२४ मते मिळाली. नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. भाजप आघाडीने आठ जागा जिंकल्या. विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाला सहा जागा मिळाल्या. अन्याय निवारण तिसऱ्या आघाडीला दोन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळाली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर