KL Rahul’s Century : राहूलचे शतक, पंतचे अर्धशतक

KL Rahul’s Century

लंडन : क्रिकेट पंढरी असलल्या लॉर्डस् च्या खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी के.एल. राहूल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा यशस्वी मुकाबला केला. राहूलने (१००) शतक झळकावले तर ऋषभ पंतने अर्धशतक झळकावत ७४ धावा केल्या. दोघे बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि नितिश कुमार रेड्डी यांनी संयमी खेळी करत संघाचे त्रिशतक झळकावले. चहापानाच्यावेळी खेळ थांबला तेव्हा भारताने ५ बाद ३१६ धावा केल्या आहेत. जडेजा ४० तर रेड्डी २५ धावांवर खेळत आहेत. (KL Rahul’s Century)

इंग्लंडच्या ३८७ धावांच्या पाठलाग करताना पहिल्या डावाची सुरुवात करताना दुसऱ्या दिवशी दिवसअखेर भारताने ३ बाद १२७ धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवशी के.एल. राहूल आणि ऋषभ पंत ही जोडी मैदानात उतरली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करत खेळपट्टीवर नांगर टाकून उभे राहिले. ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, बेन स्टेक्स या वेगवान गोलंदाजीचा यशस्वी मुकाबला केला. राहूलने आपल्या तंत्रशुद्ध खेळाचे दर्शन दाखवले तर पंतने आक्रमक खेळ करत धावफलक सतत वाढता ठेवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शरीरभेदी गोलंदाजी करताना बाऊन्सरचा मारा केला. पण दोघांनी संयम दाखवला. ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले. उपाहारापूर्वी उसळते चेंडू पंतच्या मनगटाला लागल्याने त्याला मैदानात मेडिकल स्टाफची मदत घ्यावी लागली. उपाहारापूर्वीच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंत धावबाद झाला. बेन स्टोक्सने अचूक थ्रो मारला. पंतने ११२ चेंडू खेळून ७४ धावा करताना आठ चौकार आणि दोन षटकार खेचले. बशिरला पुढे येऊन सरसावून मारलेला षटकार प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला.  उपाहारास खेळ थांबला तेव्हा भारताने ४ बाद २४८ धावा केल्या. पंत-राहूलने १४१ धावांची संघासाठी उपयुक्त भागीदारी केली. (KL Rahul’s Century)

उपाहारानंतर शतक झळकावण्यासाठी राहूल मैदानात उतरला. त्याने दोन धावा घेत शतक झळकावले. पण ऑफस्पिनर शोयब बशीरने त्याला बाद केले. हॅरी ब्रुकने त्याचा झेल घेतला. शतकी खेळत त्याने १३ चौकार सीमापार केले. अवघ्या सहा धावात दोन गडी बाद झाल्याने इंग्लंडच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले. पण रवींद्र जडेजा आणि नितिश कुमार रेड्डी या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजाची डाळ शिजू दिली नाही. त्यांनी भारतीय संघाचे त्रिशतक फलकावर लावले. रवींद्र जडेजा ३८ तर नितीश कुमार रेड्डी २३ धावांवर खेळत होते. दोघांनी नाबाद ५८ धावांची भागीदारी केली आहे. (KL Rahul’s Century)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर