कोलकाता : अखेरच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एका धावेने निसटता विजय मिळवला. या विजयासह कोलकात्याने प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत. (KKR Win)
इडन गार्डन्सवर रंगलेल्या या सामन्यात कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०६ धावांचे आव्हान उभारले. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या कोलकात्याने डावाच्या अखेरीस धावगती वाढवली. अखेरच्या पाच षटकांत कोलकात्याने तब्बल ८६ धावा वसूल केल्या. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने २५ चेंडूंमध्ये ४ चौकार व ६ षटकारांसह सर्वाधिक ५७ धावा केल्या. आंग्क्रिश सूर्यवंशीने ३१ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. रघुवंशी बाद झाल्यानंतर रसेल आणि रिंकू सिंह यांनी संघाचे द्विशतक पूर्ण केले. रिंकूने अवघ्या ६ चेंडूंमध्ये १९ धावा फटकावल्या. (KKR Win)
कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अडखळत झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर वैभव सूर्यवंशी ४ धावांवर बाद झाला. कुणाल सिंह राठोड, ध्रुव जुरेल आणि वनिंदू हसरंगा या राजस्थानच्या फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यशस्वी जैस्वालने एक बाजू लावून धरत ३४ धावांची खेळी केली. आठव्या षटकात राजस्थानचा निम्मा संघ ७१ धावांत गारद झाला होता. तथापि, कर्णधार रियान पराग आणि शिम्रॉन हेटमाएर यांनी राजस्थानचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. राजस्थानकडून सहाव्या विकेटसाठीची ही आजवरची सर्वोच्च भागीदारी आहे. (KKR Win)
हेटमाएर २९ धावा करून बाद झाला. शतकानजीक पोहोचलेला परागही १८ व्या षटकात हर्षित राणाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परतला. परागने ४५ चेंडूंमध्ये ६ चौकार व ८ षटकार लगावत ९५ धावा केल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोच्च खेळी ठरली. अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची आवश्यकता असताना शुभम दुबे व जोफ्रा आर्चर या जोडीने पहिल्या ५ चेंडूंमध्ये १६ धावा काढल्या. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला सामना टाय करण्यासाठी २, तर जिंकण्यासाठी ३ धावा हव्या होत्या. परंतु, वैभव अरोराच्या अखेरच्या चेंडूवर दुबे एक धाव घेऊन दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यामुळे कोलकात्याने २ धावांनी विजय मिळवला. कोलकात्याचा संघ आता गुणतक्त्यात ११ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. (KKR Win)
संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाइट रायडर्स – २० षटकांत ४ बाद २०६ (आंद्रे रसेल नाबाद ५७, रहमतुल्ला गुरबाझ ३५, आंग्क्रिश रघुवंशी ४४, जोफ्रा आर्चर १-३०, रियान पराग १-२१) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स २० षटकांत ८ बाद २०५ (रियान पराग ९५, यशस्वी जैस्वाल ३४, शिम्रॉन हेटमायर २९, वरुण चक्रवर्ती २-३२, हर्षित राणा २-४१).