जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित अपघाती निधनामुळे राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या साडेतीन दशकाहून अधिककाळ राज्यातील राजकारणात सातत्याने चर्चेत राहिलेल्या अजित दादांनी काका शरद पवारांच्या बोटाला धरून सार्वजनिक व राजकीय जीवनात प्रवेश केला. त्यांच्या सावलीत राहून महत्वाची सत्तापदे मिळवली आणि स्वतः चे स्थानही निर्माण केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी कुटुंबात जन्मलेल्या अजित पवार यांनी पाच वेळा राज्याचे उप मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
काका शरद पवारांचा राजकीय प्रवास राज्य व देशात झपाट्याने वाढत राहिल्यानंतर बारामती व पुण्यात जी पोकळी निर्माण होत होती ती भरून काढण्याचे काम अजित पवारांनी केले . १९८२ पासून साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांमधून त्यांचा वावर सुरू झाला होता.मात्र १९९१ हे वर्ष त्यांच्या राजकीय आयुष्याला निर्णायक वळण देणारे ठरले . पवार कुटुंबाचा होमग्राऊंड असलेल्या बारामतीतून ते थेट लोकसभेत निवडून गेले. लोकसभा तिकिटाचा किस्सा अजित पवारांनीच एका मुलाखतीत सांगितला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हती. राजीव गांधी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते आणि उमेदवारीची अंतिम घोषणा त्यांच्याकडूनच होत असे. महाराष्ट्रात बारामती आणि कराड या दोन जागांवरील उमेदवार सर्वात शेवटी जाहीर झाले. बारामतीतून अजित पवार आणि कराडमधून पृथ्वीराज चव्हाण. दोघांचीही लोकसभेत एकत्र एन्ट्री झाली. पुढे तब्बल दोन दशकांनंतर हीच जोडी महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्रात मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकत्र आली. मात्र, अजित पवारांच्या राजकीय प्रवासातला सर्वात निर्णायक क्षण आला तो खासदारकीचा राजीनामा देण्याचा. पी. व्ही. नरसिंह राव यांनी शरद पवारांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात बोलावल्यावर संसदेचं सदस्यत्व आवश्यक होते . सुरक्षित मतदारसंघ बारामती होता आणि तिथून काही महिन्यांपूर्वीच अजित पवार निवडून आले होते. काकांसाठी अजित पवारांनी खासदारकी सोडली आणि हा निर्णय त्यांच्या राजकीय निष्ठेचं प्रतीक मानला जातो. (kingmaker of state politics)
दिल्लीतील तीन-चार महिन्यांचा मुक्काम संपवून अजित पवार त्याच वर्षी बारामतीतून विधानसभेत पोहोचले. तेव्हापासून आजतागायत साडेतीन दशके बारामती हा अजित पवारांचा अभेद्य गड राहिला आहे. सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले.खासदार ते आमदार, मंत्री ते उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते ते पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी अजित पवारांचा प्रवास हा सातत्य, संघर्ष आणि सत्तेच्या राजकारणातील चढउतार यांचं प्रतिबिंब आहे. १९९१ मधल्या त्या पहिल्या पावलानं महाराष्ट्राच्या राजकारणात ‘अजित पवार’ नावाचा स्वतंत्र अध्याय सुरू झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (kingmaker of state politics)
सत्तेच्या राजकारणात ते पक्षाचा कणा ठरले : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षविस्तारापर्यंतची मोठी जबाबदारी अजित पवारांनी समर्थपणे सांभाळली. संघटन बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि सत्तेच्या राजकारणात ते पक्षाचा कणा ठरले. मात्र, शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्याच नावाला मिळणारी पसंती आणि पक्षांतर्गत जाणवणारा दुजाभाव, या बाबी अजित पवारांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या ठरल्या. या अस्वस्थतेचे उघड प्रकटीकरण २०१९मध्ये घडले. विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत पहाटेचा शपथविधी उरकून अजित पवारांनी बंडाचा प्रयत्न केला. मात्र,हा प्रयत्न फार काळ टिकला नाही. सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्या वेळी अजित पवारांनी सत्तेतच राहण्याचा निर्णय घेतला. (kingmaker of state politics)
राष्ट्रवादीत दोन गटात विभागणी…. पक्षात ‘अजित पवार गट’ आणि ‘शरद पवार गट’ अशी विभागणी कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे जाणवू लागली. ही चर्चा २०२३ मध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर प्रत्यक्षात उतरली. त्यांनी केवळ वेगळी वाटचालच निवडली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही दावा सांगितला. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त करत, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीपासून वेगळा अध्याय सुरू करण्याचे संकेत दिले. अखेर २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी महायुतीसोबत हातमिळवणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दीर्घकाळ साचलेल्या अंतर्गत संघर्षाचा हा निर्णायक टप्पा ठरला होता.मात्र गेल्या दोन -अडीच महिन्यापासून विशेषतः महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून काका-पुतणे यांच्यातील राजकीय विरोध मावळून ते एकत्र आले होते.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकाही दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने आगामी काळात दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होईल ,अशी चर्चा उघडपणे रंगत असतानाच अजित दादाच्या अकाली अस्तामुळे राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण करून गेली. (kingmaker of state politics)
अजित पवार : राजकीय प्रवास
कार्यकाळ
1991 – 2026 : सलग 32+ वर्षे सक्रिय राजकारण
1991 – आजतागायत : बारामतीतून 7 वेळा आमदार
संसद ते विधानसभेपर्यंत
जून 1991 – सप्टेंबर 1991 : खासदार
1991 – 1995 : पहिल्यांदा आमदार
1995 – 2026 : सलग आमदारकी
मंत्रिपदांचा आलेख
1991 – 1992 : कृषी फलोत्पादन, ऊर्जा राज्यमंत्री
1992 – 1995 : जलसंधारण, ऊर्जा राज्यमंत्री
1999 – 2004 : पाटबंधारे, फलोत्पादन मंत्री
2004 – 2009 : जलसंपदा, पाटबंधारे मंत्री
2009 – 2010 : जलसंपदा, ऊर्जा मंत्री
उपमुख्यमंत्री म्हणून पदभार
2010 – 2012 : उपमुख्यमंत्री (वित्त नियोजन, ऊर्जा)
2012 – 2014 : उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन, ऊर्जा)
2019 : उपमुख्यमंत्री (80 तास)
2019 – 2022 : उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन)
2023 – 2026 : उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री
इतर भूमिका
2022 – जुलै 2023 : विरोधी पक्ष नेते