Kargil Vijay Diwas: कारगिल विजयदिनी तीन उपक्रमांचा प्रारंभ

Kargil Vijay Diwas

द्रास (कारगिल) : तीन महत्त्वाचे उपक्रम सुरू करून कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते शनिवारी (२६ जुलै) तीन उपक्रम सुरू करण्यात आले. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून लोक शहिदांना ‘ई-श्रद्धांजली’ देऊ शकतील अशा पोर्टलची सुरूवात यावेळी करण्यात आली. (Kargil Vijay Diwas)

तसेच क्यूआर कोड-आधारित ऑडिओ गेटवे, ज्यावर १९९९ च्या कारगिल युद्धाच्या कथा ऐकू शकता येतील. तसेच लोकांना बटालिक सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) जाण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच सिंधू व्ह्यू पॉईंटला जाता येणार आहे.

दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. (Kargil Vijay Diwas)

१९९९ मध्ये याच दिवशी, भारतीय सैन्याने ऑपरेशन विजयची घोषण केली. टोलोलिंग आणि टायगर हिल सारख्या अतिउंचीच्या ठिकाणी हे युद्ध लढले गेले. जवळजवळ तीन महिन्यांच्या लढाईनंतर कारगिल युद्धातील विजयाची घोषणा करण्यात आली.

‘‘सर्वच नागरिकांना कारगिगल युद्ध स्मारकाला भेट देता येत नाही. त्यामुळे आता देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना ते ई-श्रद्धांजली देऊ शकतात,’’ असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

सशस्त्र दलांनी केलेल्या बलिदानाबद्दल आणि कर्तव्य बजावताना त्यांनी केलेल्या संकटांचा सामना आणि त्यांच्यासमोर आलेल्या अडचणींबद्दल लोकांना जागरूक करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. (Kargil Vijay Diwas)

क्यूआर कोड अॅप्लिकेशन हा दुसरा प्रकल्पही यावेळी सुरू करण्यात आला. १९९९ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांशी लढतानाच्या कथा यावर ऐकता येतील.

“ही संकल्पना संग्रहालयांसारखीच आहे, जिथे इअरफोन वापरून या कथा ऐकता येणार आहेत. सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि बलिदानाच्या गाथा ऐकायला मिळेल,” असे अधिकारी म्हणाले.

इंडस व्ह्यूपॉईंट हा आणखी एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांना बटालिक सेक्टरमधील नियंत्रण रेषेपर्यंत जाता येणार आहे. (Kargil Vijay Diwas)

‘‘यामुळे सैनिक कोणत्या परिस्थितीत सेवा करतात, कोणत्या अडचणी आणि धोक्यांचा त्यांना सातत्याने सामना करावा लागतो, याचा अनुभव प्रत्यक्षरित्या नागरिकांना घेता येणार आहे, ’’ असे यावेळी सांगण्यात आले.

कारगिल युद्धादरम्यान बटालिक हे मुख्य रणांगणांपैकी एक होते.

१०,००० फूटांपेक्षा जास्त उंचीवर असलेले बटालिक हे कारगिल, लेह आणि बाल्टिस्तानमधील धोरणात्मक स्थानामुळे कारगिल युद्धाचे केंद्रबिंदू होते.

सिंधू नदीच्या खोऱ्यातील हे छोटेसे गाव आता एक प्रमुख पर्यटक आकर्षण बनले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर