कोल्हापूर : प्रतिनिधी : दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. (Kaju Kathali)
माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मिडियावर वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी रेशन आणि कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम, काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला. या दरामध्ये जवळपास ४० ते ६० टक्के तफावत होती. कैद्यांना देण्यासाठी राज्यामध्ये जवळपास पाच कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली होती. खरेदी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवली नव्हती असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. दिवाळी फराळ म्हणून अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी १२०० रुपये किलो किंमतीची काजूकतली कैद्यांना खायला दिली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही, असा आरोप केला आहे. (Kaju Kathali)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक कारागृह या पदावर होते. अमरावती कारागृहात असताना त्यांनी एका कैद्याकडून ५०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एका कैद्याने वकिलामार्फत तक्रार केली आहे. (Kaju Kathali)