लेखणी नसती तर कदाचित मी शस्त्र उचललं असतं Jacinta Kerketta 

जसिंता केरकेट्टा या झारखंडमधील उरांव आदिवासी समाजातील कवयित्री आणि पत्रकार आहेत. आदिवासी लोकांचे विस्थापन आणि निसर्गाचा होत असलेला नाश हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. आदिवासी हक्कांसाठी ठाम भूमिका घेऊन काम करणा-या त्या कार्यकर्त्या आहेत. (Jacinta Kerketta Interview)

  • मुलाखतः प्रीथा बॅनर्जी

प्रश्न : तुमच्या कवितांमध्ये भांडवलशाहीचा आदिवासी समाजावरील आणि निसर्गावरील परिणामांचा उल्लेख वारंवार येतो. तुम्हाला हा संघर्ष मांडण्याची प्रेरणा कशी मिळाली? (Jacinta Kerketta Interview)

उत्तर: मी आठवीत शिकत असताना झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर येथे राहत होते. माझी शाळा मनोहरपूर विभागात होती,तिथं ट्रेननं जायला एक तास लागायचा. त्या भागात कोल्हान राज्य आणि हो आदिवासी समाजाच्या इतिहासासंदर्भातल्या गोष्टी मी ऐकल्या.

हो आदिवासी मुंडा समूहातील ऑस्ट्रो-आशियाई भाषिक परिवारातील आहेत आणि त्यांचं जमीन व निसर्गाशी अतूट नातं आहे. मनोहरपूर परिसर सरंडा जंगलात आहे. हे आशियातील सर्वात मोठं साल वन आहे. आदिवासी लोक साल वृक्षाची पूजा करतात. (Jacinta Kerketta Interview)

नंतर त्या भागात चिरिया गावात भारतातील सर्वात मोठी लोखंड खाण सुरू झाली. रेल्वेमार्ग घालण्यासाठी जंगलातील झाडे तोडली गेली. बाहेरील राज्यांतून अनेक लोक तिथे येऊन स्थायिक झाले. आदिवासी भागात आरा मिल्स सुरू झाल्या आणि तिथे आदिवासी लोक कामगार म्हणून काम करू लागले. हळूहळू मनोहरपूर गावाचं शहरात रूपांतर झालं, पण सत्तेवर बाहेरून आलेल्या लोकांचंच वर्चस्व राहिलं. ते आदिवासी भागात राजा-जमीनदारासारखे वागू लागले.

याच काळात जमीन वादातून माझ्या काकांची जमावाकडून हत्या करण्यात आली. माझ्या आजीला तुरुंगात टाकलं. आदिवासी लोक नरबळी देतात असा खोटा आरोप करून बातम्या छापल्या गेल्या. आमच्या संपूर्ण केरकेट्टा कुटुंबाला संपवण्याच्या धमक्या देण्यात आल्या. (Jacinta Kerketta Interview)

त्या वेळी काही नक्षलवादी गटांनी आदिवासींच्या संरक्षणासाठी उभं राहण्याची घोषणा केली. काही दिवस परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती.

मी त्या काळात बालपत्रिकांसाठी लिहित होते. या घटनांनी मला आतून हादरवलं. मला जाणवलं की आपल्याबद्दल आपणच लिहिलं नाही तर इतर लोक चुकीची कथा मांडतील. तेव्हापासून मी लेखन सुरू केलं. छंद म्हणून नव्हे, तर माझ्या लोकांचा आवाज म्हणून मी लेखनाचं व्रत स्वीकारलं.

प्रश्न: कविता तुमच्या संतापाला दिशा कशी देते? आणि इतरांना कशी प्रेरणा देते? (Jacinta Kerketta Interview)

उत्तर: जर मी लेखणी उचलली नसती तर कदाचित शस्त्र उचललं असतं. माझ्या मनात प्रचंड भावना उसळत होत्या. मी अनेक वर्ष शांत राहिले, पण शब्द कागदावर जोरात उमटत होते.

शाळेतील मुली म्हणायच्या, “तुझे शब्द बाणासारखे आहेत.” कोणी वाद घातला तर त्या बोलून भांडायच्या; मी मात्र लिहून उत्तर द्यायचे. त्या म्हणायच्या, “बोलून भांड, पण लिहू नको – लिखाण खोलवर जखम करतं.” (Jacinta Kerketta Interview)

निसर्ग आणि लेखन – या दोन्ही गोष्टींनी मला वाचवलं. हिंसेला उत्तर म्हणून मी हिंसा निवडली नाही, तर लेखन निवडलं. लेखन नदीसारखं वाहत अनेक हृदयांपर्यंत पोहोचतं.

लेखनाने माझ्या मनातील भीती दूर केली आणि मला स्वतःशी तसेच जगाशी जोडून ठेवलं. कला तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा ती आपल्याला चांगला माणूस बनवते.

प्रश्न: आदिवासी समाज पर्यावरणातील बदलांकडे कसे पाहतो?

उत्तर: आदिवासी लोक निसर्गाच्या जवळ राहतात, त्यामुळे त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निरागसता टिकून आहे. पण निसर्गाचा सतत होणारा नाश आणि विस्थापन यामुळे समाजात तणाव वाढतो आहे.

भ्रष्टाचार, आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. विकासाच्या नावाखाली आमच्या संसाधनांचं शोषण होतं आहे. आदिवासींना देशातील नवे दलित बनवलं जात आहे – जे कठीण परिस्थितीत काम करतात आणि जगतात.

माझ्यासाठी निसर्गाशी असलेलं नातं हीच जगण्याची ताकद आहे. निसर्गात राहणं म्हणजे जखम भरून येण्यासारखं आहे. त्यानं मला मानसिकदृष्ट्या मोडून पडण्यापासून वाचवलं आहे.

प्रश्न: धर्म, लैंगिक असमानता आणि सामाजिक अन्याय यांचा निसर्गाशी काय संबंध? (Jacinta Kerketta Interview)

उत्तर: हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. माणूस जसा निसर्गाशी वागतो, तसाच तो इतर माणसांशी वागतो. जेव्हा माणसाने स्वतःला निसर्गापेक्षा श्रेष्ठ समजायला सुरुवात केली, तेव्हाच त्याने काही लोकांना इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायला सुरुवात केली.

निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणून जेव्हा मी जंगल, नदी किंवा डोंगरांवरील हल्ल्यांविरोधात लिहिते, तेव्हा ते फक्त निसर्गाबद्दल नसतं; ते त्या लोकांबद्दलही असतं जे त्या भागात राहतात. (Jacinta Kerketta Interview)

प्रश्न: पर्यावरण तसेच सामाजिक न्यायासाठी कविता किती प्रभावी ठरू शकते?

उत्तर: भारतामध्ये अनेक लोकांना आदिवासी प्रश्नांबद्दल फारशी माहिती नाही. कविता त्यांना आदिवासी जगाशी जोडते. मी भारतात आणि परदेशात लोकांना कविता ऐकून रडताना पाहिलं आहे. कविता माणसांना परस्परांशी जोडते आणि देशांच्या सीमांच्या पलीकडे नाते टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. माझ्या दृष्टिकोनातून कविता सामाजिक न्यायाचा रस्ता खुला करते. भाषेच्या बाबतीत बोलायचं तर मी मुख्यतः हिंदीत लिहिते. मला संथाली बोलता येते आणि अनेक वर्षे कष्ट आणि प्रयत्न केल्यानंतर आता मला कुरुख भाषा समजते. आदिवासी भाषा अधिक निसर्गाशी जोडलेल्या आणि संवेदनशील आहेत. त्या भाषांमध्ये मोठं ज्ञान दडलं आहे. त्या नष्ट झाल्या तर समाज अमूल्य वारसा गमावेल.

प्रश्न: संरक्षण आणि निर्णयप्रक्रियेमध्ये भारतातल्या आदिवासी समुदायांची भूमिका आणि स्थिती काय आहे?

उत्तर: आदिवासी समाज आपल्या जंगल, नदी, डोंगरांवरील पारंपरिक हक्क वाचवण्यासाठी लढत आहे. ल़डाखमध्ये सहाव्या अनुसूचीची मागणी हा त्याचाच भाग आहे. (Jacinta Kerketta Interview)

देशात दोन विचारधारा आहेत – एक विचार शोषण आणि नफ्यावर आधारित आहे. आणि दुसरा विचार माणसांचे संरक्षण हे निसर्गाच्या संरक्षणाहून वेगळे नाही या विश्वासावर टिकून आले. या दोन्ही विचारधारांचा परस्परांशी संघर्ष सुरू आहे, आणि देशभरातले आदिवासी आपापल्या ठिकाणी ही लढाई लढत आहेत.

या भूमीशी कोणत्याही परिस्थितीत जोडून घेऊन राहिलेले फक्त आदिवासी लोकच आहेत. ते आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवत राहतील. काही विशेषाधिकार मिळालेल्या उच्चवर्गीयांप्रमाणे ते कधीच देश सोडून जाणार नाहीत. इथे पूर्वीपासून आधिवासी लोकच आहेत आणि हे समुदायच धरतीवरचं वैविध्य जपण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करीत राहतील.

(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या(सीएसई)`डाऊन टू अर्थ`वरून साभार)

Related posts

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

बँकिंग व्यवस्थेचे पोस्टमार्टम करणारी डॉक्युमेंटरी

माझा प्रवास: १८५७ च्या उठावाचा दुर्मिळ दस्तावेज