माझा प्रवास: १८५७ च्या उठावाचा दुर्मिळ दस्तावेज

  • देवदत्त पट्टनाईक

‘माझा प्रवास’ हे एखाद्या भारतीयाने लिहिलेल्या १८५७ च्या उठावाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी वर्णनांपैकी एक आहे. या शीर्षकाचा साधा अर्थ “माझी सफर/प्रवास” असा होता. हे पुस्तक पश्चिम भारतातील एक मराठी ब्राह्मण पुरोहित विष्णुभट गोडसे यांनी लिहिले होते. उठावाच्या काळात त्यांनी उत्तर भारतात प्रवास केला आणि अनेक घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या. (Majha Pravas by Vishnubhat Godse)

राणी लक्ष्मीबाई आणि झाशीच्या पाडावाचे एक दुर्मिळ, प्रत्यक्षदर्शी वर्णन केल्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झाले. गोडसे हे राजदरबारांना भेटी देऊन पैसे आणि दक्षिणा कमवण्यासाठी निघाले होते, परंतु ते प्रवासात असतानाच ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धचा उठाव भडकला.

त्यांच्या या वर्णनात, कोसळणाऱ्या राजकीय परिस्थितीच्या मध्यभागी अडकलेल्या एका भटक्या ब्राह्मणाने पाहिलेली भीती, अफवा, जातीय पूर्वग्रह आणि रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टी टिपल्या गेल्या होत्या. आणि त्या ब्रिटीश लष्करी अहवाल किंवा नंतरच्या राष्ट्रवादी कथांच्च्या एकदम वेगळ्या होत्या. (Majha Pravas by Vishnubhat Godse)

राजा गंगाधर राव आणि झाशीचा दरबार

या पुस्तकातील एक मनोरंजक भाग लक्ष्मीबाईंचे पती राजा गंगाधर राव यांच्याबद्दल आहे. गोडसे यांच्या सांगण्यानुसार, राजाच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांना पुनर्विवाह करायचा होता. श्रीमंत कुटुंबातील मुलीऐवजी गरीब पण प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबातील मुलगी आपल्याला हवी असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, अनेक कुटुंबांनी हे स्थळ नाकारले, कारण राजाच्या वागण्यात नेहमीसारखा पुरुषी स्वभाव नसल्याचे सर्वांना माहीत होते. लोक त्यांना “षंढ” म्हणत असत. (Majha Pravas by Vishnubhat Godse)

पुस्तकात त्यांचे वर्णन असे केले आहे की, ते पैठणी साड्या आणि सोन्याची चोळी यांसारखे स्त्रियांचे कपडे घालत, स्त्रियांसारखी केशरचना करत आणि गळ्यातले, बांगड्या, तोडे आणि नथ देखील घालत असत. ते राजवाड्यातील स्त्रियांसोबत गप्पा मारण्यात बराच वेळ घालवत.

गोडसे यांनी एका अफवेचा उल्लेख केला आहे की, राजा जुन्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या षंढांच्या “आठ प्रकारांपैकी” एका प्रकारात मोडत होता — अशा पुरुषांना बलवान, पुरुषी पुरुषांच्या सहवासात आनंद मिळतो.

असे असले तरी, गंगाधर राव हे एक चांगले आणि न्यायप्रिय शासक होते, हे गोडसे यांनी मान्य केले. लेखक ज्याला ‘विचित्र वागणूक’ समजत होता, ती बाजूला ठेवल्यास प्रजा त्यांच्यावर प्रेम करत असे आणि त्यांनी राज्याचा कारभार चोख चालवला होता. (Majha Pravas by Vishnubhat Godse)

बुंदेलखंडबद्दलचे समज आणि प्रादेशिक ओळख

या पुस्तकात बुंदेलखंडच्या लोकांबद्दलही काही व्यापक दावे करण्यात आले होते. एका उताऱ्यात असे म्हटले होते की, त्या भागातील पाण्यामुळे पुरुषत्व कमकुवत होते आणि तिथले मोठ्या संख्येने पुरुष हे “षंढ” होते. गोडसेंचे हे विचार हवामान, अन्न, पाणी आणि भूगोल यांचा माणसाचे शरीर, लिंग (जेंडर) आणि लैंगिकतेशी संबंध जोडणाऱ्या जुन्या समजुतींमधून आले होते. आधुनिकपूर्व जगातील अनेक भागांमध्ये अशाच प्रकारच्या समजुती अस्तित्वात होत्या, जिथे काही प्रदेश पराक्रमी योद्धे निर्माण करतात तर काही प्रदेश स्त्रीसुलभ पुरुष निर्माण करतात, असे मानले जाई.

ऐतिहासिक महत्त्व आणि मर्यादा

या आत्मवृत्ताचे मूल्य यात आहे की ते आधुनिक इतिहासासारखे लिहिले गेलेले नाही. यात वैयक्तिक आठवणी, गप्पागोष्टी, दरबारी अफवा, सामाजिक पूर्वग्रह, चमत्कारांच्या कथा आणि राजकीय टिप्पण्या यांचे मिश्रण आहे. “षंढ” हा शब्द एका जुन्या शब्दसंग्रहातून आला होता त्यात वेगवेगळ्या गोष्टी — उदाहरणार्थ नपुंसकता, स्त्रीसुलभता, हिजडे/नपुंसक, समलैंगिकता, परवेशधारण (cross-dressing), वंध्यत्व आणि अपत्यप्राप्तीशी न जोडलेले कोणतेही पुरुषत्व — हे सर्व एकाच लेबलखाली एकत्र केले गेले आहे. (Majha Pravas by Vishnubhat Godse)

गोडसे यांनी उठावानंतर अनेक वर्षांनी, आठवणी आणि जुन्या टिपणांच्या आधारे हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक प्रथम मराठी वाचकांमध्ये प्रसारित झाले आणि नंतर त्याचा इंग्रजीत अनुवाद झाला. आजचे इतिहासकार याकडे एक मौल्यवान परंतु अत्यंत वैयक्तिक स्त्रोत म्हणून पाहतात. हे काही तटस्थ वार्तांकन नाही, तर सामान्य भारतीयांनी १८५७ चा काळ कसा अनुभवला आणि एकोणिसाव्या शतकातील समाज लिंग, लैंगिकता, राजेशाही आणि प्रादेशिक ओळखीबद्दल कसा विचार करत होता, हे दाखवणारी एक जिवंत खिडकी आहे.

अनुवादः शरद नावरे

Related posts

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

बँकिंग व्यवस्थेचे पोस्टमार्टम करणारी डॉक्युमेंटरी

अजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कार