India’s focus on spin : भारताचा फिरकीवर भर!

India’s focus on spin

नवी दिल्ली : एजबॅस्टन येथे होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी भारतीय संघ फिरकीवर भर देण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजासोबत वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलदीप यादवचा समावेश होण्याची शक्यता आहे. सामना सुरू होण्यापूर्वी अंतिम अकरा खेळाडूंची यादी जाहीर होण्याचे संकेत संघ प्रशासनाने दिले आहेत. तर यजमान इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

भारतीय संघांचा कर्णधार शुभमन गिल याने पत्रकारांशी बोलताना आज संध्याकाळी आम्ही बुमराहबाबत निर्णय घेऊ. तसेच खेळपट्टी पाहून कोणता फिरकी गोलंदाज खेळवायचा ते आम्ही ठरवू. बुमराह संघाला उपलब्ध आहे. पण वीस गडी बाद करणारा आणि धावाही करेल असा अष्टपैलू खेळाडू शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळपट्टीची पाहणी केली. एजबस्टनची खेळपट्टी गुंतागुंतीची आहे. जरी ती हिरवी दिसत असली तरी त्याखाली कोरडा थर असल्याने शेवटच्या तीन दिवसात फिरकी गोलंदाजांना पोषक असू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाजांना खेळवण्याचा विचार करत आहे.

दरम्यान पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या इंग्लंड संघाचा आत्मविश्वास वाढला असून दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला इंग्लंडने संघाची घोषणा केली. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, आणि हॅरी ब्रुक यांचा संघात समावेश आहे. जेमी स्मिथने संघात स्थान कायम ठेवले आहे. गोलंदाजीची धुरा ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोयब बशीर यांच्यावर राहणार आहे.

कसोटीवर पावसाचे सावट

बर्मिगहॅम कसोटीवर पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे. लीडस् मधील पहिल्या कसोटीत पावसाने हजेरी लावली होती. पाच पैकी तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी २ जुलैला पाऊस पडण्याची शक्यता ८४ टक्के आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे पाच जुलैला आणि शेवटच्या दिवशी ६ जुलैलाह पाऊस पडण्याची ६० टक्के शक्यता आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही मात्र हवामान ढगाळ असेल.

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार