Indian Women’s Win : भारतीय संघ विजेता

Indian Women’s Win

कोलंबो : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिरंगी वन-डे क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. स्मृती मानधनाच्या शतकाच्या जोरावर भारताने या सामन्यामध्ये ७ बाद ३४२ धावा केल्या. त्यानंतर, स्नेह राणा आणि अमनज्योत कौरच्या गोलंदाजीमुळे भारताने श्रीलंकेचा डाव २४५ धावांत संपवला. (Indian Women Win)

या मालिकेच्या साखळी फेरीत श्रीलंकेने भारताला हरवले होते. त्यामुळे अंतिम सामनाही चुरशीचा होईल, अशी अटकळ होती. प्रत्यक्षात मात्र या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करल्यानंतर भारताने श्रीलंकेवर हल्ला चढवला. स्मृतीने प्रतिका रावलसोबत संघाला ७० धावांची सलामी दिली आणि प्रतिका बाद झाल्यानंतर हरलीन देओलसह दुसऱ्या विकेटसाठी १२० धावा जोडल्या. स्मृतीने वन-डे कारकिर्दीतील अकरावे शतक झळकावताना १०१ चेंडूंमध्ये १५ चौकार व २ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली. याबरोबरच वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या महिला फलंदाजांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानी पोहोचली. हरलीनने ४७ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर (४१) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (४४) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे भारताला साडेतीनशे धावांच्या आसपास मजल मारता आली. (Indian Women Win)

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची सलामी फलंदाज हसिनी परेराला अमनज्योतने पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर, विश्मी गुणरत्ने (३६), कर्णधार चामारी अटापट्टू (५१) आणि निलाक्षिका सिल्वा (४८) यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी रचण्यात त्या अपयशी ठरल्या. यांपैकी विश्मीला अमनज्योतने बाद केले, तर अटापट्टू आणि सिल्वा यांचे बळी स्नेह राणाने मिळवले. श्रीलंकेची अवस्था ७ बाद १९२ अशी झाली असताना तळातील अनुष्का संजीवनी आणि सुगंदिका कुमारी यांनी आठव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचून संघाचे द्विशतक पूर्ण केले. अखेर एकोणपन्नासाव्या षटकात स्नेहने संजीवनीला बाद करून श्रीलंकेचा डाव संपवला. स्नेहने ३८ धावांत ४ विकेट घेतल्या, तर अमनज्योतने ५४ धावांत ३ विकेट घेतल्या. स्मृतीने सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा, तर मालिकेत १५ विकेट घेणाऱ्या स्नेहने मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला. (Indian Women Win)

संक्षिप्त धावफलक : भारत – ५० षटकांत ७ बाद ३४२ (स्मृती मानधना ११६, हरलीन देओल ४७, जेमिमा रॉड्रिग्ज ४४, सुगंदिका कुमारी २-५९, देवमी विहंग २-६९) विजयी विरुद्ध श्रीलंका – ४८.२ षटकांत सर्वबाद २४५ (चामारी अटापट्टू ५१, निलाक्षिका सिल्वा ४८, विश्मी गुणरत्ने ३६, स्नेह राणा ४-३८, अमनज्योत कौर ३-५४).

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या