मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणा-कोणाला संधी मिळते? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra Government)
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या महायुती सरकारचा काल (दि.५) शपथविधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते व भाजपशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे अन्य मंत्र्यांचा समावेशाबाबत आता चढाओढ सुरू झाली आहे. फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्यापासून ९ डिसेंबरपर्यंत विशेष अधिवेशन होईल. त्यानंतर सुमारे १०ते १४ तारखेच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होईल हे निश्चित आहे.
मंत्रिमंडळाचा तिन्ही पक्षाचा फॉर्मुला अद्याप जाहीर झाला नसला. तरी, सर्वाधिक मंत्री हे सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपाकडे असतील. साधारण १८ ते २१ मंत्री भाजपाचे असतील. तर १२ ते १४ शिवसेना आणि ८ ते १० मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, अशी शक्यता आहे. मंत्र्यांची संख्या आणि खाते वाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांचा अद्याप फॉर्मुला निश्चित झालेला नाही. त्याबाबत कालपर्यंत प्राथमिक बोलणे झालेली होती. येत्या दोन-तीन दिवसात तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठक होवून तो फॉर्मुला निश्चित केला जाईल त्यानुसार मंत्रिपदे देण्यात येतील.
गृह नाही तर अर्थ, नगर विकास खाती द्या : शिंदे गटाचा आग्रह
शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट गृह खाते मिळण्यासाठी खूप आग्रही होता. मात्र भाजपाने हे खाते स्वतःकडेच ठेवण्याचे निश्चित केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ते राहील. त्यामुळे त्याऐवजी किमान अर्थ व नगर विकास ही खाते आम्हाला द्यावीत अशी मागणी शिंदे गटाकडून होत आहे. मात्र, महायुतीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा सुद्धा अर्थ खाते आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी आग्रही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते आपल्याकडेच ठेवायचे असून त्यासाठी त्यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. ही भेट होवू शकली नाही. त्यामुळे ही खाते कोणाच्या वाट्याला जातात. याबद्दल मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे. (Maharashtra Government)
ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट?
मंत्रिमंडळ विस्तारात पुर्वीच्या मंत्राचे कामाचे मूल्यांकन करून संधी दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारमध्ये काही ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना वगळले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सरू आहे.
विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा नार्वेकर?
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार असल्याने त्यासाठी भाजपा चा मावळत्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय हंगामी अध्यक्ष कालिदास कोळमकर हे सुद्धा इच्छुक आहेत .मात्र त्यांना संधी कमी असून नार्वेकर यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावयाचे झाल्यास इतर जेष्ठ आमदाराला अध्यक्षपदी नेमले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला द्यावयाचे ठरल्यास दिलीप वळसे- पाटील यांना अध्यक्षपद केले जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :