‘पलूस कडेगाव’ला इतिहासाची पुनरावृत्ती

कडेगाव : प्रशांत होनमाने : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पलूस कडेगांव मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाचवण्यात मोठे यश आले. राज्यात काँग्रेस व महाविकास आघाडीची दाणादाण उडाली असताना, पलूस-कडेगावचा गड राखण्यात डॉ. विश्वजित कदम यांना यश आले. या विजयामुळे त्यांची आमदार होण्याची हॅट्‌ट्रिकही झाली. कदम यांना १ लाख ३० हजार ७६९ मते मिळाली. तर भाजपाचे संग्राम देशमुख यांना १ लाख ७०५ मते मिळाली. ३० हजार ६४ इतके मताधिक्य डॉ. कदम यांनी मिळवले.

या वर्षीची निवडणूक अनेक वैशिष्ट्यांमुळे चर्चेत राहिली. गत विधानसभा निवडणुकीत डॉ. कदम यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा १ लाख ५२ मतांनी पराभव केला होता. यंदा मात्र त्यांना विजयासाठी झगडावे लागले. त्यांचे १ लाख मतांचे असणारे लीड यंदा केवळ ३० हजारपर्यंत राहिल्याने मतदारसंघात तो चर्चेचा विषय ठरला.

या मतदारसंघात १९८० ते २०२४ पर्यंत दिवंगत संपतराव चव्हाण, जी. डी. बापू लाड, डॉ. पतंगराव कदम, ॲड. संपतराव देशमुख या घराण्यांत मुख्य लढत होत होती. १९८५ ते २०२४ पर्यंत १९९५ व १९९८ ची पोटनिवडणूक वगळता मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता. डॉ पतंगराव कदम घराण्याला विजयासाठी जी. डी. लाड कुटुंबीयांची साथ १९८५ आणि २०२४ अशा दोन्ही निवडणुकीत महत्वाची ठरली. दिवंगत पतंगराव कदम यांच्या १९८५ च्या पहिल्या विजयात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जी. डी. लाड बापू यांची साथ आणि भूमिका महत्त्वाची होती. १९८० च्या निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांचा थोडक्यात पराभव झाला होता. तेव्हा १९८५ च्या निवडणुकीत एक चांगला उमेदवार म्हणून जी. डी. बापूंनी आपला शेकाप पक्ष आणि सगळी शक्ती डॉ. पतंगराव कदम यांच्या पाठीशी उभा केली होती. त्यामुळे १९८५ च्या डॉ. पतंगराव कदम यांच्या पहिल्या अपक्ष म्हणून विजयात जी. डी. बापू लाड कुटुंबीयांचा वाटा मोठा होता. त्यानंतर या मतदारसंघात अनेक स्थित्यंतरे घडून आली. लाड आणि कदम कुटुंबीय वेगवेगळ्या भूमिका घेऊन विरोधात लढले. मात्र यंदा पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती पहायला मिळाली. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक अर्ज भरताना डॉ. विश्वजीत कदम यांनी शरद पवार गटाचे नेते आमदार अरुण लाड यांच्यावर टीका केल्याने चर्चेचा विषय ठरला. त्यांनतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर डॉ. विश्वजीत कदम आणि आमदार अरुण लाड आणि युवक नेते शरद लाड यांच्यात समेटासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे या मतदारसंघात निर्णायक अशी ३० ते ३५ हजारांहून अधिक मोठा गट कार्यरत असलेले लाड कुटुंबीय ‘किंग मेकर’च्या भूमिकेत दिसून आले. हा सर्व गट कदम यांच्या पाठीशी एकदिलाने उभा राहिल्याने काँग्रेसचा विजय सुकर ठरला. त्यामुळे दिवंगत जी. डी. लाड बापू कुटुंबीय पुन्हा एकदा १९८५ व २०२४ च्या निवडणुकीत गेमचेंजर ठरल्याची चर्चा मतदारसंघात आहे. यामुळे या मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती झाली असल्याचीही चर्चा असून लाड कुटुंबीयांची साथ‌ असल्यानेच कदम कुटुंबीयांना आता हा मतदारसंघ राखण्यात यश आले असल्याची चर्चा जोरदार आहे.

शरद लाड किंगमेकरच्या भूमिकेत

आमदार विश्वजीत कदम यांनी गत निवडणुकीत १ लाख ५२ मतदान घेऊन राज्यात सर्वाधिक विक्रमी मतदानाने विजय नोंदवला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार अरुण लाड व शरद लाड यांना मानणारा ३० ते ३५ हजारांहून अधिक मोठा गट कार्यरत आहे. या लाड कुटुंबीयांची साथ व पाठिंब्यावर डॉ. विश्वजीत कदम यांचा ३० हजार मतांनी विजय सुकर झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. या सर्व निवडणूक प्रक्रियेत शरद लाड यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत शरद लाड आणि लाड कुटुंबीय असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

ही पुरोगामी विचारांची लढाई होती. आम्ही कदम- लाड कुटुंबीय सुरवातीला एकत्र आलेले आमच्याच कार्यकर्त्यांना आवडले नव्हतं. मात्र आम्ही गावोगावी जाऊन पुरोगामी विचारांची गरज असल्याचे कार्यकर्त्यांना पटवून दिले. कार्यकर्ता व मतदारांनीही पुरोगामी विचारांना आणि आम्ही मांडलेल्या विचारांना मनापासून साथ दिली म्हणून हा विजय आहे. हा विजय कदम अथवा लाड कुटुंबीय म्हणून नव्हे तर हा विजय पुरोगामी विचारांची गरज होती.

-शरद लाड, शरद पवार राष्ट्रवादी

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी