Highway fly over :कोल्हापूर शहर आणि महामार्गावरील उड्डाणपूलाचे सादरीकरण

Highway fly over

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा कागल महामार्ग आणि कोल्हापूर शहरातील उड्डाणपूलासंदर्भात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी महामार्गावरील उड्डाणपूलाचे सादरीकरण केले आहे.  तसेच  सातारा – कागल हायवे एनएच ४८ (जुना एनएच ४) रोडवरील उड्डाणपूल, सांगली फाटा ते उचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाचा डीपीआर, तसेच तावडे हॉटेल ते सीपीआर चौक शिवाजी पूल या मार्गावरील शहराअंतर्गत उड्डाणपुलाबाबत चे सादरीकरण आदी विषयांवर चर्चा झाली.

मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंता पी. एस. महाजन, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व उड्डाणपुलांशी संबंधित डीपीआरचे सादरीकरण संजय कदम यांनी केले. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली

  मंत्री मुश्रीफ यांनी  सातारा – कागल महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे या मार्गावरील प्रवासास खूप वेळ लागत आहे. या महामार्गाच्या कामाला विलंब केल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई करा, अशा सूचना दिल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गांचे काम जलद गतीने पूर्ण करा. उड्डाणपूलांचे डीपीआर अंतिम करुन लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करा, असे आदेश दिले.

मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या परीख पुल परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हा पूल शहरातून जाणाऱ्या मुख्य उड्डाण पुलाला जोडता येईल का, या दृष्टीने त्याची पाहणी करण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करुन लवकरात लवकर नव्या आराखड्यावर बैठक घ्यावी, अशा सूचना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली.

शहरातील उड्डाणपूल पाडून नवीन पूल बांधा

   स्टार बाजार समोर टेंबलाईवाडी (रेल्वे ट्रॅक वरील)उड्डाणपूल पाडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुधारित स्वरुपात नव्याने उड्डाणपूल उभारण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या.  याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत १० जून रोजी बैठक नियोजित असून याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

बैठकीत उड्डाणपूलाचे सादरीकरण

सातारा – कागल महामार्गावर कागल शहरासाठी उड्डाणपूल होण्याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी सूचना केली होती, त्यानुसार आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला असून त्याचे व सातारा – कागल महामार्गादरम्यान सांगली फाटा ते उंचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या डीपीआरचे तसेच शहराच्या प्रवेश मार्गावर पंचगंगा पुलानजीकच्या प्रस्तावित बास्केट ब्रिजचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले. शिवाजी पूल ते केर्ली दरम्यानचा रस्ता पुरामुळे पाण्याखाली जातो. या मार्गावर पाण्याचा निचरा होणाऱ्या उपाययोजना करून नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या आराखड्याचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर