Heavy rains hit : महाराष्ट्रावर अस्मानी संकट

Heavy rains hit

नवरात्र उत्सव सुरू झाला आणि त्याचवेळी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसह सोलापूर, जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या नशिबी रात्रीचं जागणं आलं. अतिवृष्टीचा फटका लाखो लोकांना बसला असून एरव्ही दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणा-या मराठवाड्यातला पाऊस आणि तिथल्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत सरकारनं सरकारी निकष बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं, त्यांना उभं करण्याची आवश्यकता आहे. अशा संकटकाळात संपूर्ण महाराष्ट्रानं मराठवाड्याच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे. (Heavy rains hit)

प्रतिनिधी

धाराशिव, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत पावसानं थैमान घातलं असून अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या भागांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.(Heavy rains hit)

 तिथले लोक सांगतात की धुव्वाधार पावसाबरोबरच विजांच्या कडकडाटामुळं प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. परंतु यावेळचं हे दुःख शेतक-यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. सगळ्याच घटकांना पावसानं रडवलं आहे. लोकांच्या घराघरात पाणी शिरल्यामुळं कुठं आसरा घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानांतून, टप-यांमधून पाणी शिरल्यामुळं छोट्या व्यावसायिकांच्यावरही संकटाची कु-हाड कोसळली आहे. शेतक-यांच्या मदतीसाठी सगळेच घटक म्हणजे राजकीय पक्ष, संघटना आग्रही राहतात. त्यांचा प्राधान्यानं विचार करायला हवा. परंतु त्याचबरोबर पावसात धंदे बुडालेल्या छोट्या व्यावसायिकांनाही आधाराचा हात देण्याची आवश्यकता आहे.(Heavy rains hit)

लातूरचे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे सांगत होते, आमच्याकडं जून, जुलै, ऑगस्ट असे कोरडे निघून जातात. पाऊस नसल्यामुळं तोंडचं पाणी पळायचं, पण यंदा हे विपरित घडलं. सुमारे पंधरा वर्षांनंतर मराठवाड्यावर हे अस्मानी संकट कोसळलं आहे. पाऊस इतका मुसळधार कोसळतोय की दहा फुटावरचंही काही दिसत नाही. काही ठिकाणी मनुष्यहानी झाली. लोक वाहून गेले आहेत. शेकडो जनावरे गोठ्यात मेल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं. काही ठिकाणी पुरात अडकलेल्या माणसांची हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुटका करावी लागली. सोयाबीन कापूस, तूर, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जूनपासूनच मराठवाड्यातही पाऊस सुरू आहे. त्यामुळं धरणं आधीच भरली आहेत. त्यामुळं धरणातल्या पाण्याचं नियोजन वगैरे गोष्टींचा प्रश्नच यावेळी आला नाही. अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटण्याच्या बेतात आहेत. पाऊस थांबला नाही, तर परिस्थिती कुणाच्याच आवाक्यात राहणार नाही. काही भागांत अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही. हवामान खात्याने २७-२८ सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने काळजी आणखी वाढली आहे.

नवरात्रोत्सवाच्या मोठ्या मिरवणुका मराठवाड्यात निघत असतात. परंतु यंदा त्यांनाही पावसाचा फटका बसला. प्रत्येकजण आपलं घर, संसार सांभाळण्याच्या कसरतीत आहे. त्यामुळं जिथं या मिरवणुकीत शेकडो लोक असायचेत, तिथं मोजक्या लोकांच्यात या मिरवणुका निघाल्याचं पाहायला मिळालं.(Heavy rains hit)

संकटं एकेकटी येतात असं नाही. घराघरात ओल पसरलीय. त्यामुळं लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाणही वाढलंय. छोट्या गावांचा संपर्क तुटल्यामुळे वैद्यकीय सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाचा फटका बसलेल्या लोकांच्या कहाण्या ऐकताना कुणाच्याही काळजाला पाझर फुटावा अशी स्थिती आहे. बाहेर पाऊस थांबत नाही आणि डोळ्यांतला पाऊसही थांबत नाही, अशी स्थिती आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर या काळात सतत चर्चेत आहेत. पुराच्या पाण्यातून वाट काढत ओमराजे लोकांच्या मदतीला धावताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी लोकांच्या किती उपयोगी पडू शकतो, हे त्यांच्याकडं पाहिल्यावर कळतं.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही बीडच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. सत्ताधारी पक्षाचे नेते असलेल्या मुंडे यांनीही सरकारनं मन मोठं करून लोकांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवेदन देणे किंवा आंदोलन करणे अशा पारंपारिक पद्धतींना फाटा देत, लातूर जिल्हा काँग्रेसने एक अभिनव उपक्रम राबवला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांसाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हे निरीक्षक आपापल्या भागातील गावांना भेटी देऊन शेती आणि इतर नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करतील. हा राजकीय पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘वॉर रूम’ सुरू करण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आधी मदत द्या आणि मग पंचनामे वगैरे सोपस्कार करा, अशी विनंती सरकारला केली आहे.(Heavy rains hit)

राज्य सरकारची यंत्रणाही तातडीच्या मदतीसाठी युद्धस्तरावर कार्यरत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  केंद्र सरकारकडे अतिरिक्त मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत राज्याकडून तातडीने कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

अतिवृष्टीचा मराठवाड्याला अतोनात फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२३ सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले,’ आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित केले असून येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागांतील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे. ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात, तिथे त्वरित आर्थिक सहाय्य वितरित केले जाते. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनामे येतील तसे जीआर काढण्यात येत आहेत. मदतकार्य कुठेही थांबलेले नाही . मृत्यू, जनावरांचे नुकसान, घरांचे नुकसान यांसारख्या दुर्दैवी घटनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वितरित करण्याचे अधिकार दिले आहेत. स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली असून, निधीची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.(Heavy rains hit)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगून फडणवीस यांनी, केंद्र सरकारकडे अतिरिक्त मागणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले.

पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. अशा संकटाच्या काळात राजकारण न करता सगळ्यांनीच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवायला पाहिजेच. आणि सरकारच्या कामगिरीकडेही लक्ष ठेवायला पाहिजे.

Related posts

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन

बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली