Heavy rain in Solapur : सोलापुरात अतिवृष्टी, नागरी वस्तीत पाणी घुसले

Heavy rain in Solapur

सोलापूर : प्रतिनिधी : परतीच्या पावसाला विलंब असताना सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गेल्या चोवीस तासात सोलापूरात अतिवृष्टी झाली असून रात्रभर विजांच्या कडककडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नागरिक भितीच्या छायेत वावरले. ड्रेनेज तुंबल्याने नागरी वस्तीत पाणी घुसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. (Heavy rain in Solapur)

हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला होता. गेल्या २४ तासात ११८.३ मिमी पावसाचे नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये आधीच भरून वाहणारे ओढे-नाले रात्रीच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून सकाळी सहा वाजता चार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बोरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना नदीजवळ न जाण्याचे आणि पाणी वाहत असताना कोणत्याही पूल न ओलांडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Heavy rain in Solapur)

रात्रीच्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केट आणि होटगी रोड तलाव परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल परिसरात, मित्र नगर, शेळगी या भागांमध्ये पाणी घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये दोन ते तीन फूटपर्यंत पाणी घुसल्याचे दृश्य पाहायला मिळत असून स्थानिक नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहरातील २५६ गाळा परिसरात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसले, त्यामुळे अनेकांना रात्रभर जागून काढावी लागली. तसेच संसारुपयोगी साहित्यामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागले. (Heavy rain in Solapur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर