कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची डबल हॅटट्रिक

विक्रांत कोरे,  कागल : कागल विधानसभा मतदारसंघावर सलग सहाव्यांदा आमदार हसन मुश्रीफ यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांना १ लाख ४५ हजार २५७ इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना १ लाख ३३ हजार ६२५ इतकी मते मिळाली. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी ११ हजार ६०९ इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. एकंदरीत हसन मुश्रीफ यांचा आपल्या ३०-३५ वर्षांचा अनुभव व कामाची सचोटी या निवडणुकीत मुश्रीफ यांना फळाला आली. या निवडणुकीत त्यांना माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. विजयानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अखेर दुरंगी लढतीत आमदार हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात सहाव्यांदा विजयाची माळ पडली.

येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इमारतीत सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्याच्या पूर्व भागातील गावापासून मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. एकूण मशिनवरील मतमोजणीच्या २६ फे-या करण्यात आल्या होत्या. प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्याच फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी जवळपास ११३० मतांची आघाडी घेतली होती, मात्र ही आघाडी फार काळ टिकली नाही. तालुक्यातील कागल शहरानंतर सर्वात मोठे गाव असणा-या कसबा सांगाव, मौजे सांगाव, सुळकूड या परिसरातून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजितसिंह घाटगे यांच्यात चढाओढ सुरू झाली. दुस-या फेरीअखेर समरजितसिंह घाटगे यांना ३९८ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर मात्र आमदार हसन मुश्रीफ प्रत्येक फेरीत वाढत गेले. आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असणा-या कागल शहरातून ते अकराव्या फेरीअखेर बानगे, चिखली, कौलगे, मळगे बुद्रुक तसेच सुरूपली, यमगे, मुरगूड या परिसरातील गावांनी त्यांना चांगली साथ देत मताधिक्यात वाढ झाली. मताधिक्यात झालेली ही वाढ गडहिंग्लज, उत्तूर या भागातही कायम राहिली.

कागल परिसरात कमी मते असली तरी इतर भागात चांगले मताधिक्य मिळाले. विशेष करून सेनापती कापशी, नानीबाई चिखली, बिद्री-बोरवडे, उत्तूर जि. प. मतदारसंघ, गडहिंग्लज शहर, कडगाव-कौलगे, उत्तूर जि. प. मतदारसंघाने आमदार मुश्रीफ यांना चांगले मताधिक्य दिले.  पोस्टल मतात हसन मुश्रीफ यांना १४४६ इतकी मते मिळाली व समरजितसिंह घाटगे यांना १७३१ इतकी मते मिळाली. पोस्टल मतामध्ये समरजितसिंह घाटगे यांना २८५ मतांचे मताधिक्य मिळाले.

नेत्यांची गळाभेट

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयाचे घोषणा होताच माजी आमदार संजयबाबा घाटगे व माजी खासदार संजय मंडलिक यांनी हजेरी लावताच विजयी उमेदवार हसन मुश्रीफ यांनी त्यांची गळाभेट घेतली.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी