Gurugram Land Case: दहा वर्षांपासून वद्रांना जाणीवपूर्वक त्रास : राहुल गांधी

Gurugram Land Case

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांचे मेव्हुणे रॉबर्ट वद्रा यांच्यावर ईडीने जमीन घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शुक्रवारी (१८ जुलै) मोदी सरकारवर थेट निशाणा साधला. गेल्या दहा वर्षांपासून वद्रा यांना मोदी सरकार जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Gurugram Land Case)

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ हॅण्डलवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, ‘‘बहीण आणि काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी, रॉबर्ट वद्रा आणि त्यांच्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कारण अत्यंत सूडभावनेने आणि राजकीय द्वेषापोटी त्यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. या सर्व संकटावर मात करण्यास ते सक्षम आहे, ते धीराने या सगळ्याचा सामना करतील, अशी माझली खात्री आहे. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे! माझ्या मेव्हुण्याला गेल्या दहा वर्षांपासून सरकार त्रास देत आहे. ईडीने दाखल केलेले ताजे आरोपपत्र या षड्यंत्राचाच एक भाग आहे,’’ असा आरोप त्यांनी केला आहे. (Gurugram Land Case)

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात रॉबर्ट वद्रा तसेच और मेसर्स स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्राइव्हेट लिमिटेडसह त्यांच्या ४३ मालमत्ताही अटॅच केल्या आहेत. त्यावर ईडीची ही कारवाई विद्यमान सरकारकडून सुरू असलेल्या राजकीय षड्यंत्राचाच भाग आहे, त्याशिवाय काहीही नाही, असे वद्रा यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

तथापि, आम्ही कायद्याचे पालन यापूर्वीही केले आहे. अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले आहे. यापुढेही कायद्याचे पालन करत राहू, असेही वद्रा यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर