कोल्हापूर : प्रतिनिधी : दागिने आणि पैश्याच्या लालसेपोटी नातवाने आजीचा विषप्रयोग खून केल्याच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला. सुरुवातीला पोलिसांनी आजीचा नैसर्गिक मृत्यू असा अंदाज वर्तवला होता. पण पोलिसांना व्हिसेरा प्राप्त झाल्यावर तपासाची चक्रे फिरली आणि नातवाच्या हातात बेड्या पडल्या. गंगावेश ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे यांचा १६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. पोलिसांनी नातू प्रेम परशराम भिऊंगडे (वय २०, रा. फुलेवाडी) याला अटक केली आहे.
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी १६ रोजी उषा भिऊंगडे या त्यांच्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर वैद्यकीय अहवालात हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र घटनास्थळी पंचनामा करताना लक्ष्मीपुरी पोलिसांच्या निदर्शनास आले की, त्यांच्या अंगावरील दागिने गायब होते. त्यामुळे संशय बळावला.मृतदेह पुढील तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक अहवालात हृदयविकाराचा उल्लेख असला तरी पोलिसांनी खबरदारी म्हणून व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला होता. (Grandson poisoned grandmother to death for jewellery)
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी पथकासह तपास सुरू केला. तपासादरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास उषा यांच्या घरी त्यांचा नातू प्रेम आला होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी प्रेमला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी तांत्रिक माहिती व परिस्थितीजन्य पुरावे समोर ठेवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी वापरले जाणारे विषारी द्रव्य त्याने आजीच्या चहात मिसळले. चहा घेतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हातातील सहा पाटल्या, गळ्यातील दोन चेन आणि कानातील फुले असे सुमारे दहा तोळ्यांचे दागिने घेऊन तो तेथून पळून गेला. प्रेम भिऊंगडे हा शहरातील एका महाविद्यालयात बी.ए.च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर तो पारंपरिक पद्धतीने सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करण्याचे काम करत होता. चैनीची सवय आणि पैशांची गरज यामुळे त्याने आजीचे दागिने चोरण्याचा कट रचला. मात्र त्या सहज दागिने देणार नाहीत, हे लक्षात आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलत विषप्रयोग करून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Grandson poisoned grandmother to death for jewellery)
शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, एपीआय सागर वाघ, अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, अमित सर्जे, हंबीरराव अतिग्रे, राजेश राठोड आणि सागर चौगुले यांच्या पथकाचा सहभाग होता. (Grandson poisoned grandmother to death for jewellery)